Raj Thackeray: लक्षात ठेवा मनसेचंच पोट्टं वरवंटा फिरवणार, राज ठाकरेंनी नागपुरात कार्यकर्त्यांना दिला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 01:39 PM2022-12-23T13:39:10+5:302022-12-23T13:39:28+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर असून त्यांनी आज पक्षाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना आपल्या हस्ते नियुक्तीपत्र दिली.
नागपूर-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर असून त्यांनी आज पक्षाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना आपल्या हस्ते नियुक्तीपत्र दिली. यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भविष्यात मनसेचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. "नागपूर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आज भाजपाचा आहे आणि कालांतराने हेही चित्र बदलेल. जे आपल्यावर हसताहेत त्यांनी हसावं. हे पोट्टं काय करणार असंही तुम्हाला काही लोक बोलत असतील तर बोलू द्यावं. पण मी विश्वास देतो की एकदिवशी हेच पोट्टं तुमच्यावर वरवंटा फिरवणार", असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज नागपूरातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली. तसंच पक्षाच्या वाढीसाठी प्रत्येकानं जीवाचं रान करुन काम करण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केलं. पक्षाला पदाधिकारी मिळत नसल्याचा आरोप करणाऱ्यांचे डोळे उघण्यासाठी आजचा कार्यक्रम आयोजित केल्याचंही राज ठाकरे बोलले.
"मनसेला पदाधिकारी मिळत नाहीत अशा बातम्या काहींनी दिल्या होत्या. अशा लोकांच्या डोळ्यात अंजन घालावं म्हणून आज नियुक्ती पत्रकं सर्वांसमोर वाटत आहे. पक्ष वाढवणं काही सोपं काम नाही. त्यासाठी जीवाचं रान करावं लागतं. आज जो पक्ष बहुमतानं सत्तेत आहे. त्यालाही बहुमत मिळण्यासाठी कित्येक वर्ष वाट पाहावी लागली आहे. आज सारंकाही इस्टंट हवं असतं. पण राजकारणात इस्टंट गोष्टी चालत नाहीत. महात्मा गांधींचं एक चांगलं वाक्य आहे, जेव्हा तुम्ही शुल्लक वाटत असता तेव्हा तुम्हाला कुणी महत्व देत नाही. पण आपण जेव्हा मोठे होऊ तेव्हाच सगळे आपल्याशी लढायला येतील. फक्त तुमच्यामध्ये आग असली पाहिजे. पराभव होईल पण खचून चालणार नाही. पराभव कुणाचा नाही झाला. दिग्गजांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मनसेचं पोट्टं काय करणार असं आज तुम्हाला बोलत असतील, पण हेच पोट्टं उद्या तुमच्यावर वरवंटा फिरवणार", असं राज ठाकरे म्हणाले.
आमदार, खासदार तुम्हालाच व्हायचंय
आज जरी आपला पक्ष सत्तेत नसला तरी भविष्यात जेव्हा आपल्या हाती सत्ता येईल तेव्हा तुम्हालाच आमदार, खासदार व्हायचं आहे. माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्यापैकीच मनसैनिक उद्या सत्तेच्या खूर्चीवर असतील. सत्तेच्या खूर्चीचा मोह मला नाही, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"