मास्क नसलेल्यांना बसमध्ये प्रवेश नाही : परिवहन विभागाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 11:54 PM2020-09-02T23:54:54+5:302020-09-02T23:57:07+5:30

खासगी प्रवासी बस ऑपरेटर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने तसेच परिवहन विभागाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. मास्क न घातलेल्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देऊ नये, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी (नागपूर शहर) दिनकर मनवर यांनी केले आहे.

Those without masks do not have access to the bus: Transport Department instructions | मास्क नसलेल्यांना बसमध्ये प्रवेश नाही : परिवहन विभागाचे निर्देश

मास्क नसलेल्यांना बसमध्ये प्रवेश नाही : परिवहन विभागाचे निर्देश

Next
ठळक मुद्दे बसेसचे करावे लागणार निर्जंतुकीकरण

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : खासगी प्रवासी बस ऑपरेटर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने तसेच परिवहन विभागाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. मास्क न घातलेल्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देऊ नये, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी (नागपूर शहर) दिनकर मनवर यांनी केले आहे.
महाराष्ट्र मोटार वाहन नियमानुसार लोकसेवा वाहनाच्या प्रत्येक चालकाने आपले वाहन स्वच्छ व निर्जंतुकीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानुसार कंत्राटी बसच्या चालकाने त्यातून प्रवास करणारा पर्यटक गट बदलताना तसेच प्रवासाच्या प्रत्येक दिवशी प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करावे. कंत्राटी बसच्या चालकाने प्रत्येक फेरीअंती प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करावे. बसचे आरक्षण कक्ष - कार्यालय, चौकशी कक्ष यांची वेळोवेळी स्वच्छता करावी. त्याचप्रमाणे उपस्थित कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असताना मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. बसेस जिथे उभ्या राहतात त्याठिकाणी गर्दी होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी.
बसच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर ठेवण्यात यावे. तसेच बसमध्ये प्रवाशांना वापरण्यासाठी काही अतिरिक्त मास्क ठेवण्यात यावेत. बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची ‘थर्मल गन’द्वारे तपासणी करण्यात यावी. एखाद्या प्रवाशास ताप, सर्दी-खोकला ही प्राथमिक लक्षणे दिसत असल्यास, अशा प्रवाशांना बसमधून प्रवास करण्यास मनाई करावी. कंत्राटी बस (सिटिंग) वाहनांमध्ये प्रवासी ‘एकाआड एक’ पद्धतीने आसनस्थ होतील, अशाप्रकारे प्रवासी वाहतूक व्यवस्था असल्यास परवानगी असेल. स्लिपर बस वाहनांमध्ये डबल बर्थवर एक प्रवासी तसेच स्वतंत्र सिंगल बर्थवर एक प्रवासी याप्रमाणे वाहतुकीस परवानगी राहणार आहे.
चालकाने प्रवासादरम्यान जेवण, अल्पोपहार, प्रसाधनगृहाचा वापर या कारणाकरिता बस थांबविताना ही ठिकाणे स्वच्छ आहेत, याची खात्री करावी. प्रवासादरम्यान बस थांबविली असताना प्रवासी शारीरिक अंतर पाळतील, याची दक्षता घ्यावी. प्रवाशांना बसमध्ये कचरा फेकू देवू नये. प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करणे तसेच त्याचा लेखाजोखा ठेवणे याची जबाबदारी परवानाधारकाची राहणार असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाने कळविले आहे.

एसटीच्या बसेस प्रवासाला निघण्यापूर्वी त्या स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करण्यात येते. प्रवाशांना मास्क घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. एका सीटवर एकाच प्रवाशाला बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी अजून काही सूचना दिल्यास त्या सूचनांचे पालन करण्यात येईल.
- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक नागपूर

Web Title: Those without masks do not have access to the bus: Transport Department instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.