नागपुरात महिला सक्षमीकरणाकरिता आले हजारावर मुलींचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:44 PM2018-02-05T12:44:15+5:302018-02-05T12:47:06+5:30
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण नागपूर विभागाने महिला सक्षमीकरणासाठी नोकरी मेळावे घेण्याचा प्रशंसनीय उपक्रम सुरू केला आहे. राज्यातील हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण नागपूर विभागाने महिला सक्षमीकरणासाठी नोकरी मेळावे घेण्याचा प्रशंसनीय उपक्रम सुरू केला आहे. राज्यातील हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. त्यांतर्गत रविवारी झाशी राणी चौकाजवळील सेवासदन विद्यालयात नागपूर, चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यातील एमसीव्हीसी व आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण मुलींसाठी नोकरी मेळावा घेण्यात आला. त्यात २८० नोकऱ्यांसाठी हजारावर मुलींनी अर्ज सादर केले.
मेळाव्यासाठी हिंगणघाट (वर्धा) येथील पी. व्ही. टेक्सटाईल्सने २००, मिहानमधील फ्युचर सप्लाय चेन कंपनीने ६० तर, बुटीबोरी येथील स्पेस वूड कंपनीने २० नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या. कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी मुलींचे अर्ज स्वीकारून त्यांच्या प्राथमिक मुलाखती घेतल्या. अर्जांची पडताळणी केल्यानंतर सर्वोत्तम मुलींना नोकरी दिल्या जाणार आहेत.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण नागपूर विभागाचे सहसंचालक चंद्रकांत निनाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना हा मेळावा यशस्वी झाल्यामुळे आनंद व्यक्त केला. नागपूर विभागात ७६ आयटीआय व १६६ एमसीव्हीसी महाविद्यालये आहेत. त्यामुळे मेळाव्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. असे मेळावे घेण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. पुणे व औरंगाबाद येथे नोकऱ्या उपलब्ध आहेत, पण विदर्भातील मुली तिकडे जात नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी विदर्भातच संधी उपलब्ध करून देण्याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पुढील मेळावा २४ जानेवारी रोजी वर्धा येथे होणार आहे असे त्यांनी सांगितले.
हा मेळावा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण नागपूर विभाग, अनुलोम-अनुगामी लोकराज्य महाभियान, पुणे सेवासदन संस्था व यशस्वी अकॅडमी फॉर स्कील यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. सीआरपीएफच्या सहायक कमांडंट स्वाती तांदळे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. चंद्रकांत निनाळे, अनुलोमचे विदर्भ विभाग प्रमुख हेमंत ब्राह्मणकर, जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी सुधा ठोंबरे, सेवासदन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका हेमलता अकर्ते हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सीमा महाजन यांनी संचालन तर, शाल्मली पवार यांनी आभार व्यक्त केले.