दीक्षाभूमीवरून हजारो बौद्ध बांधवांना हाकलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 01:01 AM2019-10-16T01:01:03+5:302019-10-16T01:04:47+5:30
सोमवारी १४ ऑक्टोबर रोजी धम्मदीक्षा दिनानिमित्त दीक्षाभूमीवर आलेल्या हजारो बौद्ध बांधवांना रात्रीच्या वेळी हाकलून लावल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोमवारी १४ ऑक्टोबर रोजी धम्मदीक्षा दिनानिमित्त दीक्षाभूमीवर आलेल्या हजारो बौद्ध बांधवांना रात्रीच्या वेळी हाकलून लावल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. समता सैनिक दलाने पत्रपरिषद घेऊन या घटनेचा निषेध नोंदवत पोलीस व स्मारक समितीवर नाराजी व्यक्त केली आहे.
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या दिवसाची आठवण म्हणून नागपूरकर व परिसरातील हजारो बौद्ध बांधव या दिवशी दीक्षभूमीवर कुटुंबासह येतात. परंतु मागील काही वर्षांपासून रात्रीच्या वेळी त्यांना हाकलून लावण्याचे प्रकार वाढले आहे. सोमवारी सुद्धा असाच प्रकार घडला. रात्री मोठ्या संख्येने नागरिक दीक्षाभूमीवर जमले होते. परंतु १० वाजेपासून त्यांना बाहेर काढण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला परिसरातील दिवे बंद करण्यात आले. अनेक लोक कुटुंबासह जेवण करीत होते. त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. यावरून काही लोकानी पोलिसांशी वाद घातला. तेव्हा आम्हाला समितीकडून तशा सूचना असल्याचे सांगण्यात आले. हा अतिशय निंदनीय प्रकार आहे.
दीक्षभूमीचे गेट हे रात्री ८ वाजता बंद होते. परंतु १४ तारीख ही विशेष आहे. या दिवशी हजारो लोक राहतात. काही दूरवरूनही येतात. अशा वेळी त्यांना वेळ झाला म्हणून रात्रीच्या वेळी बाहेर काढणे योग्य नाही. या दिवशी दीक्षाभूमीत लोकांना रात्री उशिरापर्यंत राहू देण्यात यावे, अशी मागणी लोकांची आहे परंतु त्याकडे स्मारक समिती लक्ष देत नाही, याचा आम्ही निषेध हा प्रकार तातडीने थांबवण्यात यावा, अशी मागणी समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक सुनील सारीपुत्त व प्रवक्ते प्रकाश दार्शनिक यांनी केली. यावेळी कांचन वासनिक, दिपांकर सहारे, सुदर्शन गेडाम, गोपाल बागडे, डॉ. अनिल दवडे, अश्विनी खोब्रागडे आदी उपस्थित होते.