हजारो नागरिक रात्रभर अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:07 AM2021-03-22T04:07:17+5:302021-03-22T04:07:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शनिवारी आलेल्या वादळी पावसामुळे शहरातील बहुतांश भागातील बत्ती गुल राहिली. काही ठिकाणी तर नागरिकांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शनिवारी आलेल्या वादळी पावसामुळे शहरातील बहुतांश भागातील बत्ती गुल राहिली. काही ठिकाणी तर नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारातच काढावी लागली.
शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. बेसा येथील उपकेंद्रातून ३३ केव्हीची लाईन सूतगिरणीकडे जाते. या लाईनमध्ये तांत्रिक त्रुटी आल्याने (ब्रेकडाऊन) पूर्व नागपूर व दक्षिण नागपूर अंधारात बुडाले. महावितरणच्या सूत्रानुसार दीड तासानंतर या भागातील वीज दुसऱ्या लाईनवरून जोडण्यात आली. परंतु यानंतरही अनेक भागात वीज नव्हती. तसेच वादळी पावसामुळे रामबाग फीडरवर झाडाची फांदी पडल्याने या फीडरशी जुळलेल्या तब्बल अडीच हजार घरांची वीज गेली. वंजारीनगर, मेडिकल चौक परिसरातील नागरिकांचे कनेक्शन या फीडरशी जुळलेले आहेत. या भागात रात्री १०.३० वाजताच्या सुमारास गेलेली वीज रविवारी सकाळी ७.३० वाजता आली. त्यामुळे येथील हजारो नागरिकांना रात्रभर अंधारातच राहावे लागले. त्याचप्रमाणे शहरातील बहुतांश भागात शनिवारी रात्री अनेक तास वीज नव्हती.