ठगबाज मंचलवारची कोट्यवधीची मालमत्ता जप्त

By admin | Published: March 3, 2015 01:31 AM2015-03-03T01:31:12+5:302015-03-03T01:31:12+5:30

दाम दुप्पटचे आमिष दाखवून भोळ्याभाबड्या गुंतवणूकदारांकडून ठेवी गोळा करून

Thousands of crores of crores of property seized | ठगबाज मंचलवारची कोट्यवधीची मालमत्ता जप्त

ठगबाज मंचलवारची कोट्यवधीची मालमत्ता जप्त

Next

नागपूर : दाम दुप्पटचे आमिष दाखवून भोळ्याभाबड्या गुंतवणूकदारांकडून ठेवी गोळा करून चार वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झालेल्या महाल झेंडा चौक येथील ठगबाज हरिभाऊ महादेव मंचलवार याची कोट्यवधीची मालमत्ता आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केली आहे. त्यामुळे पीडित गुंतवणूकदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्याची आशा बळावली आहे.
प्रारंभी रत्नांचा व्यवसाय करणाऱ्या मंचलवार याने आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून ठेवी स्वीकारण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. दोन वर्ष, अडीच वर्षाच्या मुदत ठेवीवर दाम दुप्पट, अशा योजना चालवून त्याने गुंतवणूकदारांना भुरळ पाडली होती. पहाटे ६ वाजता गुंतवणूकदारांच्या घरी जाऊन तो त्यांच्या व्याजाचे वाटप करायचा, त्यामुळे त्याच्यावर गुंतवणूकदारांचा विश्वास बसला होता.
त्याने ३९४ गुंतवणूकदारांकडून १७ कोटी ३८ लाख ५८ हजार रुपये गोळा करून तो बेपत्ता झाला होता. त्यामुळे गुंतवणूकदार वैफल्यग्रस्त झाले होते. शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. कोतवाली पोलिसांनी ३ जून २०११ रोजी हरिभाऊ मंचलवार आणि त्याची पत्नी मीनाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्याच्या पत्नीला व साळी निशा चंद्रपवार यांना अटक करण्यात आली होती. मात्र तो अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. (प्रतिनिधी)
अशी आहे जप्त मालमत्ता
पोलिसांनी आतापर्यंत मंचलवार याची कोट्यवधीची मालमत्ता जप्त केलेली आहे. त्याच्या घरझडतीतून १ लाख ५२ हजार ८०६ रुपये रोख, १२ लाख ५८ हजार ६५५ रुपये किमतीचे दागिने आणि १० लाख ५० हजार रुपये किमतीच्या दोन मारुती मोटारगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या ठगबाजाचे एकूण ४ लॉकर गोठवण्यात आले होते. त्यापैकी २ लॉकरमध्ये केवळ १,७०३ रुपये आढळून आले. त्याचे विविध बँकांमधील ३३ खाते गोठविण्यात आले होते. त्यात ८९ लाख ८६ हजार ९९१ रुपयांची रोख रक्कम आढळून आली. पोस्टाच्या एकूण १० खात्यांमध्ये २ लाख ७३ हजार ७६४ रुपये आढळून आले. याशिवाय २७ विमा पॉलिसी गोठवण्यात आल्या. या पॉलिसींची सरेंडर व्हॅल्यू १७ लाख ८९ हजार ६७८ रुपये आहे. आरोपीच्या विविध ठिकाणी असलेल्या कोट्यवधीच्या ११ स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या आहेत.
रोखेसह ही संपूर्ण मालमत्ता महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण अधिनियम १९९९ अन्वये जप्त करण्यात आली आहे. या संपूर्ण मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आर्थिक गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश मच्छिंद्र हे तपास अधिकारी आहेत.

Web Title: Thousands of crores of crores of property seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.