उपराजधानीत एक हजारावर मद्यधुंद चालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 02:48 PM2020-03-11T14:48:49+5:302020-03-11T14:53:02+5:30
उपराजधानीत दोन दिवसांत १०२६ मद्यपी वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून जवळपास पाच लाखांपेक्षा जास्त दंड पोलिसांनी वसुल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी धडाकेबाज मोहीम चालविली. दोन दिवसांत १०२६ मद्यपी वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून जवळपास पाच लाखांपेक्षा जास्त दंड पोलिसांनी वसुल केला. राज्यभरातील सर्वात मोठी कारवाई नागपुरात करण्यात आली हे विशेष.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंगपंचमीनिमित्त शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. रस्त्यावर अपघात होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस मोठ्या प्रमाणात बंदोबस्तात होते. सोमवार आणि मंगळवारी वाहतूक पोलिसांनी विशेष अभियान राबवित पहिल्या दिवशी ३१५ तर दुसºया दिवशी ७११ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. कामठी परिमंडळाच्या पोलिसांनी सर्वाधिक १५० मद्यपींवर कारवाई केली तर कॉटन मार्केट परिमंडळाने १४४ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली. अनेक मद्यपींच्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. ज्या चालकांना वाहन चालविणेही कठिण जात होती, अशा चालकांना अख्खी रात्र पोलीस ठाण्यात घालवावी लागली. यासोबत मुंबई दारू कायद्याअंतर्गत नागपूर पोलिसांनी ३३ आरोपींना अटक करून ३ लाख ४९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगार अड्ड्यांवर छापे घालून ६१ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ५३ हजार रुपए जप्त करण्यात आले. शहरभरात राबविण्यात आलेल्या कारवाईमुळे वाहनचालकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.
वाहतूक परिमंडळानुसार अशी झाली कारवाई
परिमंडळ ९ मार्च १० मार्च कारवाई
एमआयडीसी ३५ ५५ ९०
सोनेगाव २० २५ ४५
सीताबर्डी २७ ८९ ११६
सदर १७ ५३ ७०
कॉटन मार्केट २८ ११६ १४४
अजनी २१ ७८ ९९
सक्करदरा ४१ ५६ ९७
लकडगंज ४१ ७० १११
इंदोरा ३५ ६९ १०४
कामठी ५० १०० १५०
-------------------------------------------------
एकूण ३१५ ७११ १०२६