सामूहिक रजा आंदोलनात मनपाचे हजारो कर्मचारी सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 10:32 PM2019-09-13T22:32:38+5:302019-09-13T22:33:45+5:30
सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, यासाठी नागपूर महानगरपालिका कर्मचारी-शिक्षक संघटना समन्वय समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सामूहिक रजा घेऊन संविधान चौकातील आंदोलनात सहभाग घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, यासाठी नागपूर महानगरपालिका कर्मचारी-शिक्षक संघटना समन्वय समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सामूहिक रजा घेऊ न संविधान चौकातील आंदोलनात सहभाग घेतला.
सातवा वेतन आयोग लागू करावा, यासाठी महाराष्ट्र राज्य महापालिका कामगार व कर्मचारी संघटना फेडरेशनने सामूहिक रजा आंंदोलनाचे आवाहन केले होते. महापालिकेतील बहुसंख्य कर्मचारी-शिक्षक सामूहिक रजा आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनात ९० टक्के कर्मचारी व शिक्षक सहभागी झाल्याचा दावा, राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लाईज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे व मनपा शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गवरे यांनी केला.
महापालिका कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा यासह अन्य मागण्यासंदर्भात फेडरेशनच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर शासनाने महापालिकांना आयुक्तांना महासभेत ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविण्याबाबतचे परिपत्रक काढले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने शासनाला अहवाल पाठविला होता. परंतु शासनाने यावर अद्याप निर्णय जाहीर केला नसल्याने कर्मचाºयांना महापालिका प्रशासनाने सातवा वेतन आयोग लागू केलेला नाही. त्यामुळे सामूहिक रजा आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला होता.
आंदोलनात सहभागी कर्मचारी व शिक्षकांना सुरेंद्र टिंगणे,अध्यक्ष राजेश गवरे, मनपा एम्प्लाईज युनियनचे अध्यक्ष जम्मू आनंद, रंजन नलोडे, किशोर आकोजकर,देवराव मांडवकर,शेषराव गोतमारे, ईश्वर मेश्राम,मिलिंद चकोले,प्रवीण तंत्रपाळे, गौतम गेडाम, सुदाम महाजन,डॉ. बाळासाहेब बन्सोड, जयसिंग कछवाह, प्रकाश चमके, रमेश गवई, मोतीलाल जनवारी, बाबा श्रीखंडे महिला कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष कल्पना मेश्राम, प्रकाश चमके आदींनी मार्गदर्शन केले. सातवा वेतन आयोग लागू न केल्यास बेमुदत संप करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी राष्ट्रपाल खोब्रागडे,धर्मदास मेश्राम, पुरुषोत्तम कैकाडे, राजू नन्नावरे, बळीराम शेंडे, कुणाल यादव, शीतल जांभुळकर, सुषमा नायडू, परवीन सिद्दीकी, मलविंदर कौर लांबा, गीता विष्णू, पुष्पा वर्मा, योगेश नागे, योगेश बोरकर, सत्यपाल मेश्राम, मारोती नासरे, मारोती पाल, संजय शिंगणे, अभय अफनवार आदींनी प्रयत्न केले.