मेडिकल पीजीच्या हजार जागा वाढणार ! संजय मुखर्जी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 11:30 PM2019-08-23T23:30:00+5:302019-08-23T23:30:02+5:30
पीजीच्या एक हजार जागेचा प्रस्ताव मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडे पाठविण्यात आला आहे. सध्याची गरज लक्षात घेता या प्रस्तावाला मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी येथे व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) ९७० जागा वाढल्या आहेत. लवकरच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) जागाही वाढण्याची शक्यता आहे. पीजीच्या एक हजार जागेचा प्रस्ताव मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडे पाठविण्यात आला आहे. सध्याची गरज लक्षात घेता या प्रस्तावाला मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी येथे व्यक्त केली.
‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अॅल्युमनाय असोसिएशन, नागपूर’तर्फे आयोजित ‘डायमंड ज्युबली गोल्ड मेडल अवॉर्ड’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून लेफ्टनंट जनरल डॉ. माधव तुटकने, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे, अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माझी अधिष्ठाता डॉ. विभावरी दाणी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अॅल्युमनाय असोसिएशनचे उपाध्यक्ष पद्मश्री डॉ. अशोक गुप्ता व डॉ. मनीष श्रीगिरीवार, सचिव डॉ. सुधीर नेरळ, उपअधिष्ठाता डॉ. डी.टी. कुंभलकर उपस्थित होते. या प्रसंगी एमबीबीएसच्या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षात सर्वाधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘गोल्ड मेडल’ देऊन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
‘पीजी’च्या जागा वाढल्यास महाविद्यालयात आवश्यक पायाभूत सोयी, शिक्षकांची पदेही भरले जातील. पुढील वर्षात या वाढीव जागेवर प्रवेश दिला जाईल, अशी शक्यता वर्तवित डॉ. मुखर्जी म्हणाले, नागपूर मेडिकलमध्ये घडलेल्या अनेक डॉक्टरांनी विविध क्षेत्रात आपल्या नावासोबतच मेडिकलचे नाव मोठे केले आहे. येथील माझी विद्यार्थ्यांच्या संघटनेचे नेटवर्क सर्वात मोठे आहे. ही संघटना सामाजिक बांधिलकी जपत असल्यामुळेही मेडिकलची प्रगती होत आहे. ‘एमबीबीएस’नंतर ‘पीजी’ करताना सध्या कुठल्या विषयाला महत्त्व आहे, ते पाहून प्रवेश घेतला जातो. परंतु आपली आवड कशात आहे, ते पाहून प्रवेश घेतल्यास आणखी चांगले यश मिळविता येते, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
प्रत्येक संस्थेची एक वेगळी ओळख असते. तशी मेडिकलची आहे. येथील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात आपली छाप सोडली आहे, असे कौतुक करीत डॉ. वाकोडे म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रातही सामाजिक बांधिलकीचा स्तर घसरत चालला आहे. म्हणून अधिक चांगले वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करून देण्याची व त्याचा फायदा रुग्णांना करून देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. या प्रसंगी डॉ. गुप्ता यांनी माझी विद्यार्थी संघटनेच्या कार्याची माहिती दिली. डॉ. मित्रा यांनी मेडिकलचा थोडक्यात इतिहास सांगून प्रस्तावित प्रकल्पाची माहिती दिली. प्रास्ताविक डॉ. दाणी यांनी केले. संचालन डॉ. मीना मिश्रा यांनी तर आभार डॉ. नेरळ यांनी मानले.
सैन्यात वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून देश सेवा-डॉ. तुटकने
डॉ. माधव तुटकने म्हणाले, ‘आर्मी मेडिकल’मध्ये वैद्यकीय सेवेतील नैतिकता प्राथमिकतेने जपण्याचा प्रयत्न होतो. जो विद्यार्थी येथे शिक्षण घेतो तो एकाच वेळी शिक्षक, सैनिक, डॉक्टर म्हणून भूमिका निभावण्यासाठी तयार होतो. या तिन्ही सेवा उच्चतम सेवा मानल्या जातात. सैन्यातील वैद्यकीय सेवा ही या तिन्ही सेवांचा संगम आहे. सैन्यात काम करताना देश सेवा करण्याचे समाधान मिळते. तरुण मुलामुलींना सैन्यात प्रचंड संधी आहे. त्याचा लाभ तरुणांनी उचलावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यांना मिळाले ‘गोल्ड मेडल’
‘एमबीबीएस’च्या प्रथम वर्षात सर्वाधिक गुण घेणारा निखील संजय सोनुने, द्वितीय वर्षात सर्वाधिक गुण घेणारा आकाश नितीन कोतवाल, तृतीय वर्षातील ‘पार्ट १’ मध्ये सर्वाधिक गूण घेणारी स्वाती कमलेश सोंदिया व तृतीय वर्षातील ‘पार्ट-२’मध्ये सर्वाधिक गुण घेणारी अश्विनी हरीश लाहोटी यांना गोल्ड मेडल’ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. लाहोटी हिला ‘जोश गोल्ड मेडल’ हा पुरस्कार देऊनही सन्मानित करण्यात आले.
माझी विद्यार्थ्यांचा केला सत्कार
या कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मेडिकलचे माजी विद्यार्थी डॉ. क्रिष्णा कांबळे, डॉ. उदय बोधनकर, डॉ. एम.एस. रावल व डॉ. प्रफुल्ल मोकादम यांचा सत्कार करण्यात आला.