आज धावणार हजारो नागपूरकर : राज्यभरातील खेळाडूही दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:29 PM2018-02-10T23:29:25+5:302018-02-10T23:34:05+5:30
लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित भोजवानी फूड्स प्रस्तुत नागपूर महामॅरेथॉन स्पर्धेचा महाकुंभ रविवारी (दि.११) कस्तूरचंद पार्कवर भरणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित भोजवानी फूड्स प्रस्तुत नागपूर महामॅरेथॉन स्पर्धेचा महाकुंभ रविवारी (दि.११) कस्तूरचंद पार्कवर भरणार आहे. ‘मी धावतो माझ्यासाठी’ हा संदेश देण्यासाठी होणाऱ्या महामॅरेथॉनमध्ये हजारो धावपटू धावणार आहेत. यानिमित्ताने राज्यातील विविध भागांतील धावपटू नागपुरात डेरेदाखल झाले असून, ऐतिहासिक महामॅरेथॉन पर्वासाठी समस्त नागपूरकरदेखील सज्ज झाले आहेत.
महामॅरेथॉन स्पर्धेची प्रतीक्षा आता संपली असून, रविवारी पहाटे ५ वाजेपासून कस्तूरचंद पार्कवर धावपटूंचा मेळा भरणार आहे. या स्पर्धेविषयी शहरात कमालीचा उत्साह संचारला आहे. गेल्या महिनाभरापासून या स्पर्धेविषयीची उत्सुकता असून, संपूर्ण शहर हे मॅरेथॉनमय झाले आहे.
सकाळी ६.३० वाजता २१ कि.मी. अर्धमॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखविण्यात येईल. त्यानंतर ६.४५ वाजता १० कि.मी., सकाळी ७ वाजता पाच कि.मी. आणि ७.१५ वाजता तीन कि.मी. फॅमिली रनला सुरुवात होणार आहे. कार्यक्रमाचे आकर्षण असलेली ‘दिव्यांग रन’ एक कि.मी. अंतराची असेल. त्याआधी मैदानावर महामॅरेथॉन उद्घाटनाचा नेत्रदीपक आणि रंगारंग असा सोहळा रंगणार आहे. यावेळी झुंबा डान्सचे कलावंत धावपटूंचा उत्साह वाढविणार आहेत.
क्रीडाविश्वात या महामॅरेथॉनमुळे उत्साह संचारला आहे. सर्वच गटांतील मॅरेथॉनमध्ये नागपूरकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असून, आंतरराष्ट्रीय धावपटूंसह शहरातील आबालवृद्ध, व्यावसायिक, उद्योजक, अधिकारीवर्ग, संरक्षण दलातील सैनिक आणि हौशी धावपटू या मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. दरम्यान, या स्पर्धेसाठी मॅरेथॉन मार्गावर नियोजन करण्यात आले असून, रॅली मार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त, स्वयंसेवक तसेच मार्गदर्शक असणार आहेत.