घातपात रोखण्यासाठी 'रेल्वे ट्रॅक'शेजारी हजारो 'लाईव्ह कॅमेरे!

By नरेश डोंगरे | Published: September 28, 2024 09:49 PM2024-09-28T21:49:33+5:302024-09-28T21:49:40+5:30

समाजकंटकांना आवरण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून उपाययोजना

Thousands of 'live cameras' next to 'railway tracks' to prevent accidents! | घातपात रोखण्यासाठी 'रेल्वे ट्रॅक'शेजारी हजारो 'लाईव्ह कॅमेरे!

घातपात रोखण्यासाठी 'रेल्वे ट्रॅक'शेजारी हजारो 'लाईव्ह कॅमेरे!

- नरेश डोंगरे

नागपूर : रेल्वे लाईनवर घातक साहित्य ठेवून रेल्वे गाड्यांना घातपात घडवून आणण्याचे षडयंत्र रचणारे समाजकंटक सध्या रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी ठरले आहेत. त्यांना वठणीवर आणण्यासाठी रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणांनी रेल्वे लाईनच्या बाजूला हजारो 'लाईव्ह कॅमेरे प्लान्ट' करण्याची योजना आखली आहे. अलिकडे रेल्वेगाड्यांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यात काही दिवसांपासून ठिकठिकाणच्या रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलेंडर, डिटोनेटर, मोठमोठे दगड, लोखंडी सळाखी आणि असेच घातक साहित्य आढळले आहे. 

कुठे फिश प्लेटचे नटबोल्ट खिळखिळे झाल्याचे तर कुठे जॉईंटजवळ काड्या केल्याचेही आढळत आहे. रेल्वे गाड्यांना घातपात घडवून आणण्याच्या षडयंत्राचाच हा भाग असल्याचा संशय घेतला जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि संबंधित सुरक्षा यंत्रणांनाही हादरल्या आहेत. रेल्वेचे कर्मचारी 'ट्रॅक पेट्रोलिंग' करून अनर्थ टाळण्यासाठी प्रयत्नशिल असले तरी रेल्वेचे विस्तारलेले नेटवर्क बघता प्रत्येक ट्रॅकवर सुरक्षेची यंत्रणा उभारणे आणि प्रत्येक वेळी नजर ठेवणे अशक्य आहे. घातपात घडवून आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या समाजकंटकांना शोधून काढणेही जिकरीचे काम ठरले आहे. त्यामुळे रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणांनी 'थर्ड लाईव्ह आय'चा अभिनव उपाय शोधला आहे.

'थर्ड आय'ला अलर्ट करण्याचे प्रयत्न
रेल्वे ट्रॅकच्या आजुबाजूला काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे राहतात. मात्र, त्यांची संख्या मर्यादित आहे. उलट ट्रॅकशेजारी राहणारी मंडळी थर्ड आय बणून अपघात रोखण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडू शकतात. त्यामुळे यापुढे रेल्वेचे तसेच सुरक्षा दलाचे कर्मचारी, जवान नियमित नागरिकांच्या संपर्कात राहणार आहेत. त्यांच्याशी भेटीगाठी घेऊन त्यांना समाजकंटकांच्या मुसक्या आवळण्यासाठी आणि रेल्वे अपघात रोखण्यासाठी अलर्ट करण्याचे प्रयत्न केले जाणार आहे. गाव-शहरातील नागरिकच नव्हे तर जंगलात गुरे चाणरांची, राखण करणारांनाही अलर्ट मोडवर आणण्याचे प्रयत्न केले जात आहे.

तात्काळ अॅक्शन मोड'च्या सूचना
रेल्वे लाईनच्या आजुबाजुला कुठे, कोणताही संशयीत आढळल्यास तात्काळ अॅक्शन मोडवर या. जवळच्या रेल्वे अधिकारी, कर्मचारी, रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) जवान, रेल्वे पोलीस (जीआरपी) यांच्यापैकी कुणालाही तात्काळ सूचना द्या. देशाचे सजग प्रहरी म्हणून अभिमानाची कामगिरी बजावा, असे नागरिकांना सांगण्यात येत आहे.

जनजागरणाची विशेष मोहिम
रेल्वेचा एक अपघात घडला तर शेकडो प्रवाशांच्या जान-मालाला नुकसान पोहचवू शकतो. त्यामुळे समाजकंटकांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी आणि रेल्वेचे अपघात रोखण्यासाठी लोकसहभागच अत्यंत प्रभावी उपाय ठरणार असल्याचे सर्वमान्य मत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जनजागरण करून नागरिकांची मदत घेतली जात असल्याचे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे सुरक्षा आयुक्त दीपचंद आर्य यांनी लोकमतशी बोलताना म्हटले आहे.
 

Web Title: Thousands of 'live cameras' next to 'railway tracks' to prevent accidents!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे