- तर हजारो नागरिक मतदानापासून राहतील वंचित
By admin | Published: February 21, 2017 01:54 AM2017-02-21T01:54:37+5:302017-02-21T01:54:37+5:30
नागपूर महानगरपालिका निवडणुकांचे मतदान अगदी तोंडावर येऊन ठेपले असतानादेखील मतदार यादीसंदर्भातील संभ्रम संपलेला नव्हता.
मनपा, राजकीय पक्षांकडून ‘व्होटर स्लिप’ पोहोचल्या नाहीत : मतदान कुठे करणार?
नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकांचे मतदान अगदी तोंडावर येऊन ठेपले असतानादेखील मतदार यादीसंदर्भातील संभ्रम संपलेला नव्हता. एकीकडे ‘आॅनलाईन’ शोधामध्ये नाव सापडत नसताना मनपा प्रशासन व राजकीय पक्षांकडूनदेखील अनेक मतदारांच्या घरी ‘व्होटर स्लिप’ पोहोचलेल्या नव्हत्या. त्यामुळे मंगळवारी नेमके मतदान कुठे करावे याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. जर अशीच स्थिती कायम राहिली तर अनेक नागरिक लोकशाही प्रणालीतील सर्वात मोठे शस्त्र असलेल्या मतदानाचा प्रयोग करण्यापासून वंचित राहतील की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
एरवी मतदानापूर्वी उमेदवार मतदारांना ‘व्होटर स्लिप’चे वाटप करतात. परंतु यावेळी महापालिका प्रशासनाने यासाठी पुढाकार घेतला आहे. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी महापालिका प्रशासनातर्फे विविध उपक्रम हाती घेण्यात आले. जनजागृतीसोबतच प्रथमच मतदारांना घरपोच मतदार स्लिप वाटपाचा उपक्रम राबविण्याची घोषणादेखील करण्यात आली. महापालिकेतर्फे मतदार यादीच्या आकाराचे स्लिप छापण्यात आले व शहरातील २० लाख ९३ हजार ३९२ मतदारांना या स्लिप घरपोच देण्यात येतील, असा दावादेखील करण्यात आला.
‘स्लिप’वर मतदाराचा फोटो, नाव व मतदान केंद्राचा क्रमांकाची माहिती देण्यात आली.
शुक्रवारपासून याचे काम सुरू झाले व बऱ्याच ठिकाणी ‘व्होटर स्लिप’ पोहोचल्या. मात्र काही प्रभागांतील नागरिकांना या ‘स्लिप’ची प्रतिक्षाच आहे. सोमवारी उशीरापर्यंत नागरिकांपर्यंत मनपाकडून कुणीही पोहोचले नव्हते. त्यामुळे अनेक नागरिकांना मंगळवारी नेमके कुठे मतदान करावे, याची माहितीच नव्हती. विविध ठिकाणी त्यांच्याकडून विचारणा होत होती. ‘आॅनलाईन’देखील अनेकांची माहिती उपलब्ध नव्हती. संकेतस्थळावर नाव टाकूनदेखील मतदानकेंद्राची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. मतदान करा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते. मात्र त्यासाठी व्यवस्था उभारुन त्याची योग्य अंमलबजावणी का करण्यात येत नाही आणि असेच राहिले तर मतदानाची टक्केवारी कशी वाढणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.
मतदानाच्या दिवशीदेखील होणार वाटप
मतदानाच्या दिवशीदेखील होणार वाटप
यासंदर्भात मनपाचे अप्पर आयुक्त रवींद्र कुंभारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी काही ठिकाणी ‘व्होटर स्लिप’ पोहोचली नसल्याचे मान्य केले. मात्र युद्धपातळीवर हे काम सुरू असून मतदानाच्या दिवशीदेखील मतदारांना ‘व्होटर स्लिप’चे वाटप करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. कुणीही मतदानापासून वंचित राहणार नाही, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
एकाच वस्तीत
आधे इधर, आधे उधर
मतदार याद्यांमध्ये असलेला घोळ आता समोर येऊ लागला आहे. उमेदवार मतदारांपर्यंत पोहचून त्यांचे मतदान कोणत्या केंद्रावर आहे याची माहिती देत आहे. उत्तर व पश्चिम नागपूरच्या सीमेवर कोराडी रोडला लागून धाम ही वस्ती आहे. या वस्तीमध्ये एका घरचे मतदार प्रभाग १ मध्ये तर दुसऱ्या घरचे मतदार प्रभाग ११ मध्ये आले आहेत. एकाच वस्तीत एकाच रांगेत राहणाऱ्या मतदारांची दोन वेगवेगळ्या प्रभागात विभागणी करण्यात आल्याने मतदारांमध्ये संभ्रम व कमालीचा रोष आहे. या उदाहरणामुळे मतदार यादीमध्ये असलेला घोळ मतदानापूर्वीच समोर आला आहे.