बदलीच्या दरबारात हजारांवर पोलिसांची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:08 AM2021-07-17T04:08:48+5:302021-07-17T04:08:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नियोजित सेवाकाल पूर्ण झालेल्या आणि बदलीसाठी पात्र असलेल्या सुमारे एक हजार पोलीस कर्मचाऱ्यांची आज ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नियोजित सेवाकाल पूर्ण झालेल्या आणि बदलीसाठी पात्र असलेल्या सुमारे एक हजार पोलीस कर्मचाऱ्यांची आज पोलीस आयुक्तांनी त्यांच्या पसंतीनुसार बदली केली.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गेल्या वर्षीपासून कर्मचाऱ्यांच्या ‘बदलीचा दरबार’ उपक्रम सुरू केला आहे. ज्यांनी एका ठिकाणी पाच वर्षांचा सेवाकाळ पूर्ण केला, अशा पोलीस कर्मचाऱ्यांना दरबारात बोलवायचे. त्यांना त्यांच्या पसंतीक्रमाची तीन ठिकाणे विचारायची आणि जेथे रिक्त जागा आहे, तेथे त्यांची नियुक्ती करायची, अशी ही सरळसाधी मात्र प्रभावी पद्धत आहे. पोलीस जिमखान्यात आज बदलीचा दरबार भरविण्यात आला होता. त्यात सुमारे १२०० कर्मचारी सहभागी झाले. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी आणि मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त संदीप पखाले यांनी संबंधित अधिकारी आणि लिपिकांना समोरासमोर बसवून दुपारी १२ वाजतापासून रात्री ७ वाजेपर्यंत सुमारे १ हजार पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या मनपसंत ठिकाणी बदली देण्याचा निर्णय घेतला.
---
कर्मचाऱ्यांत बहार, मध्यस्थ हद्दपार
यापूर्वी पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया बाबू आणि मध्यस्थांच्या मनमर्जीने चालायची. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सलगी ठेवून असणारे काही जण आपली पाच-दहा नावांची यादी मंजूर करून घ्यायचे. बाबूंच्या मर्जीप्रमाणे न वागल्याने अनेक प्रामाणिक आणि चांगले काम करणाऱ्या पोलिसांना मनासारखे ठिकाण मिळत नव्हते. मात्र, ‘बदली दरबार’मुळे मध्यस्थ हद्दपार झाले. त्यामुळे कर्मचारी आनंदाने बहरले आहेत.
---