महाराष्ट्र बंददरम्यान नागपुरात हजारो आंदोलकांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 10:24 AM2018-01-05T10:24:15+5:302018-01-05T10:25:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरेगाव भीमा प्रकरणाचा निषेध नोंदवताना विना परवानगी रॅली काढून, टायर जाळणे, रस्ता अडवून घोषणाबाजी करणे तसेच वाहतुकीस अडसर निर्माण केल्याच्या आरोपाखाली शहरातील पाच वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात एक हजारपेक्षा जास्त भीमसैनिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
कोरेगाव भीमा प्रकरणाचे संतप्त पडसाद बुधवारी शहरात उमटले. वेगवेगळ्या भागात संतप्त जमावाने बुधवारी सकाळपासून रात्रीपर्यंत रॅली काढून, टायर जाळून, दगडफेक करून रस्ता अडवून आपला रोष व्यक्त केला. असा प्रकार होऊ नये म्हणून यापूर्वीच सहपोलीस आयुक्तांनी नागपुरात मनाई आदेश जारी केला होता. त्याला न जुमानता हे प्रकार घडले.
सीताबर्डी पोलीस ठाण्यात सर्वाधिक १४ अधिक ५०० आंदोलकांवर (१४ आंदोलकांची नावे आहेत. त्यांच्यासोबत असलेले ५०० आंदोलक)गुन्हे दाखल झाले. टायर जाळणे, रस्ता अडविणे, सरकारविरोधी घोषणाबाजी करीत पोलिसांना अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोपही लावण्यात आला असून आंदोलकांविरुद्ध कलम १४३, १४७, १४९, ११७, ४२७, ४३५, ३४१ भादंवि, सहकलम ७ (क्रिमिनल लॉ अमेडमेंट अॅक्ट १९३२)तसेच मुंबई पोलीस कायदा १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. अशाच प्रकारे जरीपटका पोलिसांनी ३०० आंदोलकांविरुद्ध टायर जाळणे, रस्ता अडवून धरण्यासोबतच जमावाने मेट्रोच्या बॅरिकेडस्वर तसेच पोलिसांवर दगडफेक करण्याचा आरोप लावला. पोलिसांना शिवीगाळ केल्याचाही आरोप लावून इंदोºयातील जमावावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पाचपावली पोलीस ठाण्यात १५० आंदोलकांवर गैरकायद्याची मंडळी जमविणे, रस्ता अडविणे, टायर जाळून मनाई आदेशाचे उल्लंघन करणे आणि बेकायदेशीरपणे व्यापारी प्रतिष्ठाने बंद करणे असे आरोप लावण्यात आले आहे. यामुळे पाचपावलीतील बाजारपेठेत अंदाजे १० लाखांच्या उलाढालीचे नुकसान झाल्याचाही आरोप पोलीस पत्रकात नमूद आहे.
शताब्दी चौक तसेच अजनी परिसरात अशाच प्रकारे आंदोलन करणाऱ्या ४० आंदोलकांवर अजनी ठाण्यात गुन्हे दाखल झाले. त्याचप्रमाणे जुनी कामठी पोलीस ठाण्यात नागपूर - रामटेक बसवर दगडफेक केल्याप्रकरणी चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.