दीक्षांत समारंभ होणार तरी कधी, हजारो विद्यार्थ्यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:11 AM2021-06-16T04:11:20+5:302021-06-16T04:11:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील हजारो विद्यार्थी मागील अनेक महिन्यापासून पदवीच्या प्रतीक्षेत आहेत. कोरोनामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील हजारो विद्यार्थी मागील अनेक महिन्यापासून पदवीच्या प्रतीक्षेत आहेत. कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या दीक्षांत समारंभाच्या आयोजनाबाबत विद्यापीठ प्रशासनाने पावले उचललेली नाहीत. राज्यातील अनेक विद्यापीठांचे दीक्षांत समारंभ आटोपले असताना नागपूर विद्यापीठाकडून कधी आयोजन होणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
‘कोरोना’च्या दुसऱ्या लाटेचा फटका नागपूर विद्यापीठालादेखील बसला. ११ एप्रिल रोजी नियोजित विशेष दीक्षांत समारंभ व २३ एप्रिल रोजीचा १०८ वा दीक्षांत समारंभ पुढे ढकलण्यात आला. विशेष दीक्षांत समारंभात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांना ‘एलएलडी’ या मानद पदवीने सन्मानित करण्यात येणार होता. परंतु कडक निर्बंधांमुळे आयोजन करणे शक्य नव्हते. ‘कोरोना’मुळे ‘ऑनलाईन’ आयोजन करावे का, असा विचारदेखील पुढे आला होता. परंतु हा समारंभदेखील पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
आता नागपुरातील स्थिती नियंत्रणात आली आहे. अशास्थितीत विद्यापीठाने दीक्षांत समारंभासाठी पाऊल उचलणे अपेक्षित होते. सोमवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैैठकीतदेखील यावर काहीच चर्चा झाली नाही. दीक्षांत समारंभाची तारीख निश्चित झाल्यानंतर अतिथींना आमंत्रित केले जाईल. त्यातही विशेष दीक्षांत समारंभात वरिष्ठ पदावरील अतिथी बोलवावे लागणार आहेत. त्या प्रक्रियेला लागणारा वेळ लक्षात घेता, ऑगस्ट महिना किंवा त्यानंतरच दीक्षांत समारंभाचे आयोजन होऊ शकेल. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांना संपर्क केला असता त्यांनी अद्याप दीक्षांतबाबत नेमका निर्णय झाला नसल्याचे सांगितले.
इतर विद्यापीठात झाले, नागपूरला का नाही?
कोरोनाची लाट असतानादेखील राज्यातील काही विद्यापीठात ऑनलाईन माध्यमातून दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले. जर इतर ठिकाणी ‘ऑनलाईन’ दीक्षांत समारंभ होऊ शकतो, तर नागपूरला का नाही, असा प्रश्न विद्यापीठ वर्तुळात उपस्थित होत आहे.