विदर्भात हजारो टन संत्र्यांची नासधूस; उत्पादक चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 02:34 PM2020-03-27T14:34:25+5:302020-03-27T14:35:09+5:30

वादळ आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणात संत्र्यांच्या उभ्या पिकाची नासधूस झाली आहे. झाडांवरून संत्री गळून पडली आहेत. त्यामुळे उरल्यासुरल्या संत्र्यांची तोड लवकर न झाल्यास, ते गळून पडण्याची भीती निर्माण झाली आहे.

Thousands of tonnes of oranges destroyed in Vidarbha; Manufacturers worried | विदर्भात हजारो टन संत्र्यांची नासधूस; उत्पादक चिंतित

विदर्भात हजारो टन संत्र्यांची नासधूस; उत्पादक चिंतित

Next
ठळक मुद्देआधीच ‘कोरोना’चा मार, आता पाऊसही झोंबला

वसीम कुरैशी/
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत संत्राउत्पादकांना संत्र्यांचे भाव वाढतील, अशी अपेक्षा होती. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्याच्या हेतूने करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे उत्पादक चिंतित होते. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी आलेले वादळ आणि रात्री बरसलेल्या पावसाने त्या चिंतेला संकटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वादळ आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणात संत्र्यांच्या उभ्या पिकाची नासधूस झाली आहे. झाडांवरून संत्री गळून पडली आहेत. त्यामुळे उरल्यासुरल्या संत्र्यांची तोड लवकर न झाल्यास, ते गळून पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
विदर्भातील संत्री उत्पादकांच्या जवळपास ८० टक्के मालाची विक्री झाली आहे, तर २० टक्के संत्री अजूनही झाडांनाच आहेत. लॉकडाऊनमुळे कळमना मार्केटचे कामकाज थांबले आहे. या काळात संत्र्यांना ग्राहक उपलब्ध होणे गरजेचे आहे. या संत्र्यांच्या विक्रीकरिता सरकारकडे सहकार्याची याचना केली जात आहे. विशेष म्हणजे संत्री उत्पादकांकरिता हे वर्ष उत्तम राहिले आहे. शंभर टक्के पीक झाल्याने उत्पादकांमध्ये उत्साह होता. होळीच्या एक आठवड्यानंतरपर्यंत ८० टक्के पीक काढण्यात आले. याच काळात बाजारात संत्री ३० हजार रुपये प्रति टन भावाने विकली जात होती. मिळणारा हा मोबदला उत्तम मानला जात होता. मात्र काही उत्पादकांनी आणखी भाव मिळेल, या आशेने आपला माल रोखून ठेवला होता. मात्र, कोरोनाचा मार पडला आणि अपेक्षांची धुळधाण झाली. त्यावर वादळ आणि पावसाने उरलीसुरली अपेक्षाही धुळीस मिळाल्याची स्थिती आहे.

पीक चांगले झाले

: विदर्भात जवळपास ९० हजार हेक्टरमध्ये संत्र्यांचे उत्पादन घेतले जाते. दरवर्षी ७ ते ८ लाख टन संत्री उत्पादित केले जातात. यंदा पीक उत्तम झाले. संत्र्यांची तोड फेब्रुवारीपासून सुरू होते आणि मार्चच्या अखेरपर्यंत हे पीक काढले जाते.
- एम.एस. लदानिया : संचालक, लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्था नागपूर

विदर्भाच्या संत्री उत्पादकांसाठी हा काळ अतिशय निराशाजनक आहे. जी संत्री झाडांवरच आहेत, त्यांना मार्केटमध्ये विक्रीची व देशाच्या अन्य शहरात निर्यात करण्यासाठीची कुठलीच व्यवस्था नाही. ही व्यवस्था लवकरात लवकर केली गेली नाही तर उत्पादकांना मोठो नुकसान सोसावे लागेल.
- अहमद कादर, सामाजिक कार्यकर्ता

नागपूरसह अमरावती, पांढुर्णा, सौंसर व सिवनी येथेही संत्री उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. हा माल काश्मीर ते कन्याकुमारी आणि काठमांडूपर्यंत पाठविला जातो. पाऊस आणि वादळाचा मार बसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे पीक नाशीवंत असल्याने तात्काळ निर्यातीची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
- राजेश छाबरानी, आडतिया

 

Web Title: Thousands of tonnes of oranges destroyed in Vidarbha; Manufacturers worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.