विद्यापीठातील हजारो विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:07 AM2021-05-18T04:07:46+5:302021-05-18T04:07:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांना सुरुवातीला तांत्रिक अडचणींमुळे हिवाळी परीक्षा देता आली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांना सुरुवातीला तांत्रिक अडचणींमुळे हिवाळी परीक्षा देता आली नव्हती. यातील बीई (पाचवे-सातवे सत्र), बीए (पाचवे सत्र), बीएसडब्ल्यू (तिसरे सत्र), बीपीएडचे (तिसरे सत्र), बीएस्सी गृहविज्ञान (तिसरे व पाचवे सत्र), बीएफडी (तिसरे सत्र), एचएमसीटी (पाचवे व सातवे सत्र), बॅचलर ऑफ कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी (पाचवे-सातवे सत्र) विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने परत परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून, सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे.
२५ मार्चपासून विद्यापीठाच्या ऑनलाईन हिवाळी परीक्षांना सुरुवात झाली होती. मात्र सुरुवातीला अनेकांना तांत्रिक अडचणींमुळे परीक्षाच देता आली नाही. शिवाय ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील इंटरनेट कनेक्शन नसल्यामुळे परीक्षेला मुकले. या विद्यार्थ्यांची परत परीक्षा घेण्यात येईल, असे आश्वासन विद्यापीठाने दिले होते. महाविद्यालयांकडून यासंदर्भात तक्रारीदेखील प्राप्त झाल्या होत्या. यानुसार विद्यापीठाने आता सुधारित वेळापत्रक जारी केले आहे. यात बीई पाचव्या व सातव्या सत्राची परीक्षा २२ व २३ मे रोजी, बीए पाचव्या सत्राची परीक्षा २४ व २५ मे रोजी, बीएसडब्ल्यूच्या तिसऱ्या सत्राची परीक्षा २२ व २६ मे रोजी तर तर बीपीएडच्या तिसऱ्या सत्राची परीक्षा २६ मे रोजी होईल. तर बीकॉम-बीबीए (पाचवे सत्र) २२ मे रोजी, बीकॉम तिसरे सत्र व बीसीसीए पाचवे सत्र २६ मे रोजी, बीएस्सी गृहविज्ञान(तिसरे व पाचवे सत्र)ची परीक्षा २२ व २४ मे रोजी, एचएमसीटी (पाचवे व सातवे सत्र) २४ व २५ मे रोजी, बीएफडी (तिसरे व पाचवे सत्र) २५ व २६ मे रोजी, एलएलबी (तृतीय व पाचवे सत्र) २३ व २४ मे रोजी, बीएएलएलबी (नववे सत्र) २३ मे रोजी तर बॅचलर ऑफ कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी(पाचवे-सातवे सत्र)ची परीक्षा २४ व २६ मे रोजी होणार आहे. परीक्षा विषयनिहाय वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी दिली.