रेल्वेस्थानकावर कोरोनाचा धोका; रेल्वे प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 07:00 AM2020-10-19T07:00:00+5:302020-10-19T07:00:12+5:30
Nagpur News railway station नागपूर रेल्वेस्थानकावर सर्व नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची वाहतूक सुरु आहे. येथे प्रवाशांमध्ये अंतर राहत नाही. अनेकजण मास्क घातलेले नसतात.
दयानंद पाईकराव/मुकेश कुकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेत लॉकडाऊन नंतर सहा महिन्यांनी विशेष रेल्वेगाड्या सुरु झाल्या. कोरोनाचे नियम पाळून गाड्या सुरु करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने दिले. तरीसुद्धा नागपूर रेल्वेस्थानकावर सर्व नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची वाहतूक सुरु आहे. येथे प्रवाशांमध्ये अंतर राहत नाही. अनेकजण मास्क घातलेले नसतात. रेल्वेस्थानक परिसर, प्लॅटफार्म आणि रेल्वेगाड्यातही हे धक्कादायक चित्र पाहावयास मिळाले. अशा स्थितीत रेल्वेस्थानक तर कोरोनाचे कॅरिअर होणार नाही ना अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे.
रेल्वे बोर्डाने रेल्वेगाड्या सुरु करताना काही नियम ठरवून दिले. यात प्रवाशांनी तोंडाला मास्क लावणे, आपसात दोन फुटांचे अंतर ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे आदी नियमांचा समावेश आहे. परंतु नागपूर रेल्वेस्थानक परिसर, प्लॅटफार्म आणि रेल्वेगाड्यांमध्ये या नियमांची पायमल्ली होत आहे. त्यामुळे केवळ गाड्या सुरु करणे हेच रेल्वे बोर्डाचे ध्येय असून कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी काहीच यंत्रणा नसल्याची बाब सिद्ध झाली. या बाबींमुळे रेल्वेच्या माध्यमातून कोरोनाचा झपाट्याने प्रसार होण्याची शक्यता आहे.त्यामुळे केवळ गाड्या सुरु करणे हेच रेल्वे बोर्डाचे ध्येय असून कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी काहीच यंत्रणा नसल्याची बाब सिद्ध झाली. या बाबींमुळे रेल्वेच्या माध्यमातून कोरोनाचा झपाट्याने प्रसार होण्याची शक्यता आहे.
असे आहे चित्र
नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात प्रवासी दाटीवाटीने उभे होते. त्यांच्यात अर्ध्या फुटापेक्षाही कमी अंतर होते. प्लॅटफार्मवरील चित्र तर त्यापेक्षाही भयानक होते. गाडी येणार असल्यामुळे संपूर्ण प्लॅटफार्मवर प्रवासी घोळका करून उभे होते. लवकर गाडीत चढताना फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्याचे भान कुणालाही नव्हते. कोचमध्येही प्रवासी एकमेकांना स्पर्श होईल असे बसलेले दिसले.
रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये भिती
प्लॅटफार्म क्रमांक एकवर स्टेशन संचालक, उपस्टेशन व्यवस्थापक, रेल्वे सुरक्षा दल, टीसी, लोकोपायलट लॉबी, लोहमार्ग पोलीस ठाणे आदी कार्यालये आहेत. याच प्लॅटफार्मवर अनेक रेल्वेगाड्या येतात. या गाड्यांमध्ये प्रवास करणारा एखादा पॉझिटीव्ह प्रवासी या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आल्यास संपूर्ण कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
रेल्वे प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी
रेल्वेस्थानकावर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही ही खरी बाब आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने टीसींची संख्या वाढविण्याची गरज आहे. प्लॅटफार्मवर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी गस्त घालण्याची तसेच प्रशासनाने कठोर भूमिका घेत प्रवाशांना नियमांचे पालन करण्यासाठी बाध्य करावे.
- बसंत कुमार शुक्ला, सचिव, भारतीय यात्री केंद्र