कोरोनाचा धोका टळला, तरीही निर्बर्धाचे पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:07 AM2021-07-22T04:07:36+5:302021-07-22T04:07:36+5:30
देवलापार : गत महिनाभरापासून तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. सध्या कोरोनाचा धोका नसला तरी देवलापार परिसरातील आदिवासी भागात प्रतिबंधात्मक ...
देवलापार : गत महिनाभरापासून तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. सध्या कोरोनाचा धोका नसला तरी देवलापार परिसरातील आदिवासी भागात प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेचा फटका ग्रामीण भागाला फारसा बसला नाही. मात्र दुसऱ्या लाटेत गावोगावी रुग्णसंख्या वाढली. यात अनेकांचा मृत्यूही झाला. देवलापार परिसरात १७ ग्रामपंचायती,दोन प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, पोलीस ठाणे व अप्पर तहसीलदार कार्यालय आहे. हा परिसर कोरोनामुक्त व्हावा यासाठी येथील सर्व विभागाचे कर्मचारी अहोरात्र झटले. आदिवासी बांधवाच्या जनजागृतीसाठी प्रत्येक विभागाने पुढाकार घेतला. यात अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांची भूमिका महत्वपूर्ण राहिली. या भागात देवलापारसह पवनी, करवाही, हिवराबाजार ही प्रमुख बाजारपेठेची गावे वगळता इतर गावातही बाजार भरण्यावर प्रतिबंध लावण्यात आले होते. आता काही ठिकाणी बाजार सुरू झाले आहे. पण तेही नियमांच्या चौकटीत राहून. व्यापाऱ्यांच्यावतीनेही यासाठी सहकार्य करण्यात येत आहे. यासोबतच महसूल, ग्रामपंचायत, आरोग्य व पोलीस प्रशासन नियमांचे कुठेही उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेत आहे.
यासाठी अप्पर तहसीलदार प्रेमकुमार आडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन नाईकवार, ठाणेदार प्रवीण बोरकुटे, ग्राम विकास अधिकारी भारत मेश्राम, पंडित देवकर, राजेश गाडगे, पवनीचे सरपंच डॉ. सुधीर नाखले, नारायण कुंभलकर, गणेश चौधरी, राजेश भोंडेकर, सीमा कोकोडे, वीणा ढोरे, कीर्ती आहाके, रामचंद अडमाची, नितेश सोनवाने, उमेश भांडारकर, भारत वेट्टी, निवृत्ती नेवारे, मुकेश भैसवार, उत्तम झेलगुंदे, मुकुंदा मरसकोल्हे, लीलाधर सोनवाने, भोजराज कोरे, धर्मराज घारड, बालाजी गुट्टे सर्व अधिकारी व कर्मचारी तत्पर असतात.
----
या भागात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव नाही. गतवेळेसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. स्थानिक व्यापारी आणि ग्रामस्थांनी नियमांचे पालन केल्याने संक्रमण टाळता आले.
- शाहिस्ता ईलियाज पठाण, सरपंच देवलापार
--
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका ग्रामीण भागाला अधिक बसला. अनेकांचे जीव गेले. अशा परिस्थितीत प्रशासनाला मदत करणे गरजेचे होते. व्यापारी संघटना यापुुढेही नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करेल.
- हेमंतकुमार जैन, अध्यक्ष, व्यापारी संघटना, देवलापार