संविधानाची मानवी मूल्ये धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 01:37 AM2017-09-28T01:37:49+5:302017-09-28T01:38:02+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून मानवी मूल्ये दिली आहेत. परंतु आजच्या घडीला एकूणच परिस्थिती पाहता संविधानातील ही मानवी मूल्ये धोक्यात आली आहेत,

The threat of human values ​​of the Constitution | संविधानाची मानवी मूल्ये धोक्यात

संविधानाची मानवी मूल्ये धोक्यात

Next
ठळक मुद्दे६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याला प्रारंभ : महिला परिषदेतील वक्त्यांचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून मानवी मूल्ये दिली आहेत. परंतु आजच्या घडीला एकूणच परिस्थिती पाहता संविधानातील ही मानवी मूल्ये धोक्यात आली आहेत, असा सूर दीक्षाभूमीवर आयोजित महिला परिषदेत निघाला.
६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याला दीक्षाभूमीवर बुधवारपासून सुरुवात झाली. प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि दीक्षाभूमी महिला धम्म संयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महिला परिषदेने याची सुरुवात करण्यात आली. कमलताई गवई या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होत्या तर डॉ. जुल्फी शेख, पुष्पा बौद्ध, डॉ. सरोज आगलावे, रेखा खोब्रागडे, भुवनेश्वरी मेहरे प्रमुख वक्त्या होत्या.
डॉ. सरोज आगलावे यावेळी बोलताना म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून महिलांना मोठे अधिकार दिले आहेत. एक व्यक्ती एक मत आणि एक मूल्य हे तत्त्व म्हणजेच मानवी मूल्य होय, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रेखा खोब्रागडे म्हणाल्या भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान आहे. संविधानात अनेक अधिकार दिले आहेत. हक्क आणि कर्तव्य हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. संविधानात ते नमूद आहे. संविधानाच्या जनजागृतीची मोहीम नागपुरातून सुरू झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ. जुल्फी शेख यांनी आपल्याला एक धर्म आहे, त्याची एक भाषा आहे. त्याचा निर्माता आहे आणि मार्गदाता सुद्धा आहे. तेव्हा आपल्या धर्माची भाषा (पाली) अवगत करा आणि त्याची संस्कृती जपून एकजूट राहा, असे आवाहन केले. कमलताई गवई यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संविधानावर प्रकाश टाकत बौद्ध महिलांनी एकजूट राहून कार्यरत राहण्याचे आवाहन केले. तक्षशीला वाघधरे यांनी संचालन केले. वंदना जीवने यांनी आभार मानले.
बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे पालन करा
यावेळी पुष्पा बौद्ध म्हणाल्या आपण बौद्ध आहोत, त्यामुळे बौद्धासारखेच राहिले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला २२ प्रतिज्ञा दिल्या आहेत. परंतु त्याचे पालन व आचरण होताना दिसून येत नाही. या २२ प्रतिज्ञा म्हणजेच बौद्ध धम्म होय, तेव्हा त्याचे पालन झालेच पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आजपासून धम्मदीक्षा
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर लाखो लोक येतात. मागील काही वर्षांपासून दीक्षाभूमी स्मारक समितीतर्फे दीक्षाभूमीवर धम्मदीक्षेचा कार्यक्रम सुरू केला आहे. याला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसादही मिळतो. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वातील भिक्खू गण बौद्ध धम्माची दीक्षा देतात. यंदा गुरुवारी २८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेपासून बौद्ध धम्माची दीक्षा देण्याचा कार्यक्रम सुरू होईल. ३० सप्टेंबरपर्यंत तो सुरू राहील. गुरुवारी सायंकाळी ‘भीमा तुझ्या जन्मामूळे’ हे नाटक सुद्धा सादर करण्यात येईल.
आंबेडकरी अनुयायी दाखल
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. मुख्य सोहळा शनिवारी आहे. बुधवारपासून आंबेडकरी अनुयायांचे येणे सुरू झाले आहे. बीड, औरंगाबाद येथील अनुयायी बुधवारीच दीक्षाभूमीत दाखल झाले.

Web Title: The threat of human values ​​of the Constitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.