आरडीएक्सने स्फोट करून रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी
By नरेश डोंगरे | Published: October 30, 2024 10:59 AM2024-10-30T10:59:40+5:302024-10-30T11:01:44+5:30
सुरक्षा यंत्रणांत प्रचंड खळबळ : अकोल्यातील आरोपीला अटक
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आरडीएक्सने स्फोट घडवून नागपूरचे रेल्वे स्थानक उडवून देण्याची एका आरोपीने धमकी दिली. यामुळे सुरक्षा यंत्रणांसह रेल्वे प्रशासनात प्रचंड खळबळ निर्माण झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी धावपळ करून धमकी देणाऱ्या आरोपीच्या मुसक्या बांधल्या. बुद्धूराम असे त्याचे नाव असून तो अकोल्याचा रहिवासी आहे.
पोलीस नियंत्रण कक्षाच्या ११२ क्रमांकावर रविवारी पहाटे ३ च्या सुमारास एक फोन आला. आरडीएक्स पेरून नागपूरच्या रेल्वे स्थानकावर स्फोट घडविण्यात येणार असल्याची धमकी वजा माहिती फोन करणाऱ्या आरोपीने दिली.
विशेष म्हणजे, पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने दोन आठवड्यापूर्वीच रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट घडविण्याची धमकी दिली होती. त्यामुळे या धमकीच्या फोनची सुरक्षा यंत्रणांनी गांभिर्याने दखल घेतली. लगेच रेल्वे पोलिसांना आणि रेल्वे सुरक्षा दलाला अलर्ट देण्यात आला. धमकीचा फोन ज्यावरून आला होता, त्या मोबाईल नंबरचे लोकेशन काढण्यात आले. धमकी देणारा रेल्वे स्थानक परिसरातच असल्याचे त्यावरून लक्षात आल्याने आणखीच धाकधूक वाढली होती. दरम्यान, दिवाळीच्या निमित्ताने रेल्वे स्थानक आणि परिसरात प्रचंड गर्दी होती. मात्र, जीआरपीचे पोलीस निरीक्षक गाैरव गावंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धमकी देणाऱ्या मोबाईल धारकाला शोधून काढले. तो दारूच्या नशेत टुन्न होता. त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याची चांगलीच 'सरबराई' करण्यात आली. त्याने आपले नाव बुद्धुराम सांगितले. तो अकोल्याचा मुळ निवासी आहे. नागपुरातील एका हॉटेलमध्ये तो वेटर म्हणून काम करतो.
... म्हणून दिली बॉम्बस्फोटाची धमकी
आरोपीची प्रदीर्घ चाैकशी करण्यात आली. त्याच्याकडे कोणतेही आक्षेपार्ह्य अथवा घातक साहित्य नव्हते. त्याच्या मोबाईलमधूनही संशयास्पद असे काही पोलिसांना मिळाले नाही. त्यामुळे त्याने बॉम्बस्फोटाची धमकी कोणत्या कारणामुळे दिली, त्याबाबत त्याला विचारणा करण्यात आली. बराच वेळ असंबंध्द उत्तरे दिल्यानंतर त्याने धमकी मागचे कारण स्पष्ट केले. धमकी देण्यापूर्वी तो रेल्वे स्थानक परिसरात संशयास्पद अवस्थेत दिसल्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याची चाैकशी केली. तो दारूच्या नशेत असून त्याच्याकडे रेल्वेचे तिकिटही नव्हते. तो विनातिकिट असल्याचे पाहून आरपीएफच्या जवानांनी त्याला फलाटावरून हाकलून लावले. तो अपमाण त्याच्या जिव्हारी लागला. त्याचमुळे त्याने ११२ क्रमांकावर फोन करून बॉम्बस्फोटाची धमकी दिल्याचे सांगितले. त्याच्या या कृत्यामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये काही काळ चांगलीच खळबळ निर्माण झाली होती.