नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 04:25 AM2024-04-30T04:25:23+5:302024-04-30T04:25:36+5:30
बॉम्बच्या धमकीमुळे विमानतळ व्यवस्थापन चिंतेत, तर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. सीआयएसएफ व पोलिसांनी विमानतळावर शोधमोहीम सुरू केली.
नागपूर : नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीमध्ये दहशतवाद्याने विमाने स्फोटकाने उडवून देण्याचा इशारा दिला आहे. ही धमकी सोमवारी सकाळी ९:४५ वाजता विमानतळ व्यवस्थापनाला ई-मेलद्वारे देण्यात आली.
बॉम्बच्या धमकीमुळे विमानतळ व्यवस्थापन चिंतेत, तर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. सीआयएसएफ व पोलिसांनी विमानतळावर शोधमोहीम सुरू केली. पण कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. विमानतळावर पोलिसांची १५-१५ ची दोन पथके तैनात केली आहेत. परिसरातील घडामोडींवर पोलिस लक्ष ठेवून आहेत.
कोलकाता, जयपूर, गोवा येथेही धमकी
नागपूर विमानतळाप्रमाणे सोमवारी जयपूर, आगरतळा, श्रीनगर, चंडीगड आणि वाराणसी विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल संबंधित विमानतळाला मिळाला.
त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी या विमानतळावर बंदोबस्त वाढविला तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जात होती.
कोलकाता विमानतळाला मागील तीन दिवसांत हा दुसरा धमकीचा मेल मिळाला.