मानवमुक्तीसाठी समाजवादाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही : सीताराम येचुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2022 12:30 PM2022-03-21T12:30:39+5:302022-03-21T13:29:50+5:30
भांडवलशाहीत सर्वसामान्यांचे शोषण बंद होऊ शकत नाही. संघर्ष केल्यास शासनाला झुकविण्याची ताकद मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात असून, संविधानाला वाचविण्यासाठी रस्त्यावर येऊन संघर्ष करण्याची गरज असल्याचे येचुरी यांनी सांगितले.
नागपूर : केवळ १० व्यक्तींच्या हाती देशातील ५७ टक्के संपत्ती आहे. गरीब गरीबच होत चालले असून, श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. त्यामुळे मानवमुक्तीसाठी समाजवादाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव सीताराम येचुरी यांनी केले.
भारताचा कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) २३ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन सिव्हिल लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात पार पाडले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष विजय जावंधिया, माकपाचे पॉलिट ब्युरो सदस्य निलोत्पल बसू, केंद्रीय कमिटीचे सदस्य अशोक ढवळे, मरियम ढवळे, जीवा पांडू गावित, माकपाचे राज्य सचिव आमदार नरसय्या आडम, अनिल ढोकपांडे उपस्थित होते.
सीताराम येचुरी म्हणाले, केंद्रातील भाजप सरकार हिंदुत्ववादी राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजपशासित राज्यात दलित, आदिवासी, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. बँक, एलआयसी, रेल्वेचे खासगीकरण करण्यात येत आहे. देशाच्या संपत्तीची लूट होत आहे. याविरुद्ध आवाज उठविणाऱ्यांवर हल्ले वाढत असून, देशद्रोही ठरविण्यात येत आहे. भांडवलशाहीत सर्वसामान्यांचे शोषण बंद होऊ शकत नाही. संघर्ष केल्यास शासनाला झुकविण्याची ताकद मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात असून, संविधानाला वाचविण्यासाठी रस्त्यावर येऊन संघर्ष करण्याची गरज असल्याचे येचुरी यांनी सांगितले.
अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष विजय जावंधिया म्हणाले, शहरांचा विकास होत असताना खेडी गरीब होत आहेत, ही शोकांतिका आहे. कर्मचाऱ्यांना वेतन आयोग द्या, परंतु त्यासोबतच शेतमजुरी वाढण्याची गरज आहे. संविधानाचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन संघर्ष करण्याची गरज असल्याचे मत निलोत्पल वसू यांनी व्यक्त केले. शेतकरी कामगार पक्षाचे एस. व्ही. जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालन अरुण लाटकर यांनी केले. आभार उदय नारकर यांनी मानले. अधिवेशनाला माकपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.