दहशतवादापेक्षा शहरी नक्षलवादाचा धोका अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:11 AM2021-08-14T04:11:09+5:302021-08-14T04:11:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारताला दहशतवादापेक्षा जास्त धोका शहरी नक्षलवादापासून आहे. शहरी नक्षलवादाला खतपाणी घालणारे लोक तरुणांना लक्ष्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारताला दहशतवादापेक्षा जास्त धोका शहरी नक्षलवादापासून आहे. शहरी नक्षलवादाला खतपाणी घालणारे लोक तरुणांना लक्ष्य करून त्यांच्या डोक्यात देशाच्या विरोधातील गोष्टी बिंबवत आहेत. अशा तत्त्वांपासून सर्वांनीच सावध रहायला हवे, असे मत चित्रपट दिग्दर्शक व लेखक विवेक अग्निहोत्री यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विभागातर्फे भारतीय एकात्मता व शहरी नक्षलवाद या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते ऑनलाइन माध्यमातून बोलत होते.
शहरी नक्षलवादाचा प्रचार करण्यात दुर्दैवाने काही प्राध्यापक, विचारवंतांचादेखील हात असतो. त्यांच्या माध्यमातून तरुण पिढीपर्यंत सहज पोहोचता येते. या माध्यमातून जाती-जातींमध्ये भांडणे लावत मध्यम वर्गात असंतोष निर्माण करून देश अस्थिर करण्याचा डाव्या विचारसरणीच्या लोकांचा डाव आहे. आदिवासी तरुणांनी अगोदर त्यांच्या समस्यांसाठी लढा दिला. मात्र काही विचारवंतांनी त्यांचादेखील गैरफायदा घेतला व शहरापर्यंत नक्षलवाद पसरविला. तरुणांना चिथावणी देऊन प्रशिक्षण देणे, पैसा गोळा करणे यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न सुरू आहेत. त्यात विविध क्षेत्रांतील लोकांनादेखील समाविष्ट करण्यात आले आहे. शहरी नक्षलवादातून होणाऱ्या षडयंत्रातून देशाचे जवान शहीद होत आहे. अशा लोकांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे, असे अग्निहोत्री म्हणाले. व्याख्यानाला प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, डॉ. कल्पना पांडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य विष्णू चांगदे उपस्थित होते. डॉ.निर्मलकुमार सिंग यांनी संचालन केले.