नागपुरात पार्किंगच्या नावावर सुरू आहे भाईगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 10:16 AM2018-07-03T10:16:40+5:302018-07-03T10:17:03+5:30
शहरातील बाजारपेठ परिसरात अवैध पार्किंग शुल्क वसूल केले जात आहे. पार्किंग शुल्क वसुल करणारी टोळी तयार करून सामान्य नागरिकांची लूट करीत आहे. असे असतानाही प्रशासनाची भूमिका मूकदर्शकाची आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील बाजारपेठ परिसरात अवैध पार्किंग शुल्क वसूल केले जात आहे. पार्किंग शुल्क वसुल करणारी टोळी तयार करून सामान्य नागरिकांची लूट करीत आहे. असे असतानाही प्रशासनाची भूमिका मूकदर्शकाची आहे. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे दिवसेंदिवस ‘पार्किंग बाय अनअॅथॉराईज गॅँग’चे जाळे मजूबत होत आहे. अवैधरीत्या पार्किंग शुल्क वसुली करणाऱ्या गँगमध्ये असामाजिक तत्त्वांच्या युवकांचा समावेश असल्याचे दिसते आहे. लोकमतने शहरातील काही बाजारपेठेत केलेल्या सर्वेक्षणात मनमानी करणाऱ्यांचे खरे रूप समोर आणले आहे. सीताबर्डी, इतवारी, जागनाथ बुधवारी, धरमपेठ भाजीबाजार येथे ‘पार्किंग बाय अनअॅथॉराईज गॅँग’चे जाळ दिसून येत आहे. अवैध पार्किंगची वसुली करणारे युवक वाहन चालकांना धमकवितात. त्यांना वाहन शुल्काची पावती दिली जाते. जरी वाहन चालकाने आपले वाहन पार्किंग केले नसले तरी, त्यांच्याकडून पार्किंग शुल्काची मागणी केली जाते.
सुपर मार्केटमध्ये दादागिरी
सीताबर्डीच्या सुपर मार्केटमध्ये वाहन चालकांशी दादागिरी करून पार्किंग शुल्क वसूल केले जात आहे. विशेष म्हणजे येथे पार्किंगची जागासुद्धा उपलब्ध नाही. परंतु आत प्रवेश करताच पार्किंग स्टॅण्ड असल्याचे सांगून काही युवक वाहनाचे पार्किंग शुल्क घेतात. दादागिरी इतकी की एखाद्या दुकानासामोर वाहन घेऊन उभे राहिल्यास पार्किंग शुल्क द्यावे लागते. अशाच पद्धतीने महाजन मार्केटकडे जाणाऱ्या मार्गावर दुकान अथवा एखाद्या घरासमोर वाहन उभे केल्यास पार्किंग शुल्क मागण्यात येते.
विचारणा केल्यास सर्व एकत्र होतात
अवैध पार्किंग वसुली करणाऱ्या गँगमध्ये बहुतांश युवक आहेत. पार्किंग स्टॅण्डचे कुठलेही बॅनर लावलेले नाही. असे असतानाही पार्किंग शुल्क मागत असल्यामुळे एखाद्याने नकार दिल्यास गँगचे सर्व एकत्र येऊन वाहन चालकांवर दबाव आणतात. यातून बरेचदा वादसुद्धा झाले आहेत. काही समजदार वाहन चालक वाद होऊ नये म्हणून पार्किंग शुल्क देऊन देतात.
शुल्काची पावतीही अवैध
युवकांकडून पार्किंग शुल्काची एक प्रिंटेड पावती दिली जाते. परंतु त्यात पार्किंग संदर्भात कुठलीही माहिती व नियमांचा उल्लेख नसतो. याचाच अर्थ स्पष्ट आहे की, सर्व अवैध आहे.
वाहने उचलणाऱ्या पथकांसोबत सेटिंग
अवैध पार्किंग शुल्क वसुली करण्याचे पूर्ण काम सेटिंगने चालते. वाहतूक विभागाच्या वाहन उचलणाऱ्या पथकासोबत हे सेटिंग असते. जे लोक आपले वाहन बाहेर रस्त्यावर उभे करतात, त्यांना हे पार्किंगवाले वाहन उचलणाऱ्या पथकाची धमकी देतात. सेटिंगमुळे बरेचदा नो पार्किंग पथकही येथून ये-जा करते.
पे अॅण्ड पार्कवाल्यांचीही मनमानी
शहरातील अनेक बाजारपेठात मनपातर्फे पे अॅण्ड पार्कचे कंत्राट दिले आहे. हे कंत्राटदार सुद्धा पार्किंगच्या नाववार मनमानी करीत आहे. ते दुचाकी चालकांना स्टॅण्डवर पार्किंग करण्यास दबाव आणतात. पंचशील चौकातील एका मॉलजवळील नि:शुल्क पार्किंग स्थळावर एक वृद्धाने वाहन उभे केल्याने पे अॅण्ड पार्कच्या कर्मचाऱ्यांनी त्याला शिवीगाळ केली. पे अॅण्ड पार्कमध्ये वाहन पार्क करण्यास त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला.
शहरात फक्त दोन ठिकामी मनपाने पे अॅण्ड पार्कची परवानगी दिली आहे. यातील एक स्टॅण्ड शहीद गोवारी उड्डाण पुलाच्या खाली व दुसरा स्टॅण्ड यशवंत स्टेडियमच्या समोर आहे. सीताबर्डीच्या सुपर मार्केटमध्ये वाहतूक विभागाने परवानगी दिली आहे.
- आसाराम बोदिले, उपअभियंता, मनपा वाहतूक विभाग