नागपुरात एक लाखाच्या खंडणीसाठी ट्रान्सपोर्टरला धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 08:40 PM2018-02-03T20:40:51+5:302018-02-03T20:42:19+5:30
एक लाख रुपयांची खंडणी मागून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या रामबागमधील बादल राजू गजभिये (वय ३२) याच्याविरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एक लाख रुपयांची खंडणी मागून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या रामबागमधील बादल राजू गजभिये (वय ३२) याच्याविरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
नंदू बाबारावजी पारखंडे (वय ४२) हे ट्रान्सपोर्टर आहेत. ते कुकडे लेआऊटमध्ये राहतात. त्यांचे मोक्षधाम चौकाजवळ कार्यालय आहे. आरोपी गजभिये इमामवाड्यात राहतो. त्याच्याकडे एक वाहन असून, तो ते पारखंडेच्या कार्यालयाजवळच उभे करतो. २४ जानेवारीपासून तो पारखंडे यांच्या मागे लागला आहे. तू रोज २५ हजार रुपये कमवितो. तुला महिन्याला खंडणी द्यावी लागेल, असे तो म्हणू लागला. १ फेब्रुवारीला सायंकाळी ६.३० वाजता पोलीस ठाण्याजवळच्या मोक्षधाम चौकात उभे असताना आरोपी गजभिये तेथे आला. त्याने पारखंडेना शिवीगाळ करून एक लाख रुपयांची खंडणी मागितली. न दिल्यास जीवे ठार मारेन, अशी धमकी दिली. पारखंडेंनी त्याची तक्रार गणेशपेठ ठाण्यात शुक्रवारी तक्रार नोंदवली. एएसआय भास्कर दुधकवरे यांनी आरोपी गजभियेविरुध्द गुन्हा दाखल करून आरोपीला रात्री अटक केली.
दोन दिवसांची पोलीस कोठडी
आरोपी बादल गजभिये हा कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गणेशपेठ पोलिसांनी त्याला शनिवारी कोर्टात हजर करून त्याचा दोन दिवसांचा पीसीआर मिळवला.