चिमुकल्याच्या अपहरणाची धमकी
By Admin | Published: August 21, 2015 03:28 AM2015-08-21T03:28:51+5:302015-08-21T03:28:51+5:30
सिमेंट व्यापाऱ्याला त्याचा मुलगा अथवा भाच्याचे अपहरण करून खून करण्याची धमकी देऊन दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना लकडगंज पोलिसांनी अटक केली.
१० लाखांच्या खंडणीची मागणी : नातेवाईकच निघाला आरोपी
नागपूर : सिमेंट व्यापाऱ्याला त्याचा मुलगा अथवा भाच्याचे अपहरण करून खून करण्याची धमकी देऊन दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना लकडगंज पोलिसांनी अटक केली. कुश कटारिया, युग चांडक प्रकरणामुळे हादरलेल्या पालकांमध्ये या घटनेमुळे पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे.
सय्यद खालिद अली सय्यद अहमद अली (वय ३४) असे पीडित व्यापाऱ्याचे नाव असून, त्यांचे वर्धमाननगर चौकात न्यू सिमेंट हाऊस नामक दुकान आहे. त्यांना ४ वर्षांचा मुलगा असून, ८ वर्षांचा भाचा आहे.
१२ आॅगस्टच्या दुपारी १२.२२ वाजता खालिद यांच्या मोबाईलवर एका आरोपीचा फोन आला. तुझा मुलगा आणि भाचा कोणत्या शाळेत शिकतो, ते कधी जातात, कधी परत येतात याची आम्हाला माहिती आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी तुला १० लाख रुपये खंडणी द्यावी लागेल. अन्यथा दोघापैकी एकाचे अपहरण करून खून करून टाकीन, अशी धमकी फोन करणाऱ्याने दिली. पुढच्या पाच तासात आरोपीने आणखी तीनवेळा फोन करून मुलगा किंवा भाचा यांना जिवंत ठेवायचे असेल, तर तुला सांगेल त्या ठिकाणी १० लाख रुपये आणून द्यावे लागतील, असे म्हटले. शेवटचा फोन ५.२१ वाजता आला. याबाबत कुठे वाच्यता केल्यास परिणाम गंभीर होतील, असा दमही आरोपीने दिला होता.
लकडगंजमधील युग चांडक अपहरण आणि हत्याकांडाची घटना ताजीच असल्यामुळे खालिद हादरले. त्यांनी सरळ लकडगंज पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षत घेत पोलिसांनी धावपळ सुरू केली. नमूद मोबाईलनंबर सीम कुणाच्या नावावर आहे, त्याची माहिती मिळवण्यात आली. सीमधारकाचे नाव, पत्ता बनावट असल्यामुळे पोलिसांनी सीडीआर काढला. त्यानंतर आरोपीचा छडा लागला. धमकी ज्या मोबाईलवरून आली तो मोबाईल राशिद अली नामक आरोपी वापरत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पाचपावलीतील हरदासनगरात जाऊन सय्यद राशिद सय्यद असगर अली (वय ३१) याच्या मुसक्या बांधल्या. त्याने या गुन्ह्याची कबुली देऊन बंदेनवाज नगरातील आरोपी शेख आरिश शेख बब्बू (वय २०) याच्या मदतीने केल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्यालाही त्याच्या घरातून जेरबंद केले. या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांचा कोर्टातून पीसीआर मिळवण्यात आला.
कर्जबाजारीपणामुळे गुन्हा
आरोपी राशिदची आर्थिक स्थिती गंभीर आहे. त्याच्यावर कर्जही आहे. त्यामुळे झटपट रक्कम मिळवण्यासाठी त्याने मामेभावाकडूनच खंडणी उकळण्याचा डाव रचला. दुसरा आरोपी शेख आरिश हा सुद्धा पैशाला मोताद असल्याचे लक्षात घेत राशिदने त्याला या गुन्ह्यात सहभागी करून घेतले. त्याला आपला फोन दिला. ‘तू फक्त फोन करून धमकी दे. नंतर मी सर्व सांभाळतो‘, असे राशिदने आरिशला सांगितले होते. मोबाईल ट्रॅकिंग, सीडीआरच्या माध्यमातून आरोपी पकडले जातात, हे त्यांच्या कल्पनेच्या बाहेरचे होते. त्याचमुळे राशिद आणि आरिशने हा भयंकर डाव टाकला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवल्यामुळे त्यांना कोठडीत जावे लागले. पोलीस उपायुक्त अभिनाशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी भगत, ठाणेदार एस.बी. माने यांच्या नेतृत्वात एपीआय सागर निकम,हवालदार राजेन्द्र बघेल, संजय कोटांगळे, नायक प्रवीण गाणार, अनिल अंबादे, नरेश बढेल, मनोज नेवारे, शिपाई सतीश ठाकूर, भूषण झाडे यांनी ही कामगिरी बजावली.(प्रतिनिधी)
इमोशनल ब्लॅकमेलिंग
आरोपी राशिद अली हा फिर्यादी खालिद यांचा मामेभाऊ आहे. खालिद यांच्याकडे मोठी संपत्ती आहे, याची त्याला कल्पना आहे. काही दिवसांपूर्वी खालिदच्या नात्यातील मुलाचा मृत्यू झाला. त्यावेळी ते कमालीचे व्यथित झाले होते. त्यांची ही अवस्था लक्षात घेत आरोपी राशिदने खंडणी वसुलण्याचा कट रचला. मुलगा अथवा भाच्याच्या जीवाची भीती दाखविल्यास ते सहजपणे १० लाख रुपये देतील, असा आरोपी राशिदला विश्वास वाटत होता.