फेसबुकवर झालेल्या ओळखीत प्रेमाच्या नावाखाली धमक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 12:21 PM2018-10-06T12:21:34+5:302018-10-06T12:23:22+5:30
फेसबुक फ्रेण्डवरून ओळखी झाल्यानंतर प्रेमाच्या नावाखाली विद्यार्थिनीला त्रास देणाऱ्या एका आरोपीला सक्करदरा पोलिसांनी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फेसबुक फ्रेण्डवरून ओळखी झाल्यानंतर प्रेमाच्या नावाखाली विद्यार्थिनीला त्रास देणाऱ्या एका आरोपीला सक्करदरा पोलिसांनी अटक केली. दीपक महेंद्र सहानी (वय १८) असे आरोपीचे नाव आहे. तो नंदनवनमधील जुन्या पोलीस चौकीजवळ राहतो.
पीडित मुलगी (वय १६) महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे. आरोपी सहानीसोबत तिची फेसबुकवरून काही महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतल्यानंतर ते चॅटिंग करू लागले. त्यानंतर सहानीने तिला प्रपोज केले. तिने नकार दिल्याने आरोपी तिला प्रेमाच्या नावाखाली त्रास देऊ लागला.
पाठलाग करणे, भेटण्याचा आग्रह धरणे, धमक्या देणे, असे प्रकार वाढल्याने मुलीने आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला. पालकांनी सहानी कुटुंबीयांशी संपर्क करून दीपकला समजावण्यास सांगितले. हे सर्व घडल्यामुळे दीपक काही दिवस शांत बसला. आता परत त्याचा उपद्रव सुरू झाला. बुधवारी रात्री ७ च्या सुमारास पीडित मुलगी सक्करदऱ्यातील प्रेरणा कॉलेजसमोरून जात असताना आरोपी तिला आडवा झाला. त्याने तिचा हात पकडून तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. मुलीने आरडाओरड केल्याने त्याने तिला शिवीगाळ करून तिला पाहून घेण्याची धमकी दिली. त्याच्याकडून धोका होऊ शकतो, हे ध्यानात आल्याने मुलीने आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर सक्करदरा पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी विनयभंग तसेच धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून आरोपी दीपक सहानीला अटक केली.
‘एचआर’कडून कर्मचारी महिलेचा विनयभंग
/>नागपूर : कंपनीत प्रशिक्षणार्थी महिला कर्मचाऱ्याचा हात पकडून तिच्याशी लज्जास्पद वर्तन करणाऱ्या आरोपीविरुद्ध बजाजनगर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पीडित तरुणीने (वय २४) बजाजनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ती ज्या कंपनीत प्रशिक्षणार्थी कर्मचारी म्हणून काम करते, तेथे आरोपी विनोद टाकळखेडे (वय ४५) मानव संसाधन विभागाचे प्रमुख (एचआर) आहे. २८ सप्टेंबरला सायंकाळी टाकळखेडेसमोर बसून ती नोटस् घेत असताना अचानक टाकळखेडेने तिचा हात पकडून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले. या प्रकरणाचा बोभाटा झाल्यानंतर कंपनीच्या कार्यालयाबाहेर प्रकरणाची चर्चा होऊ नये म्हणून बरेच प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्याला यश आले नाही. तरुणीने गुरुवारी बजाजनगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी टाकळखेडेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाच्या दुसऱ्या पैलूंचीही पोलीस चौकशी करीत आहेत.