नागपूरच्या मेडिकलमधून तीन आरोपी फरार : पोलीस दलात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:38 PM2017-12-20T23:38:33+5:302017-12-20T23:41:27+5:30
वैद्यकीय तपासणीसाठी मेडिकलमध्ये आलेल्या तीन आरोपींनी हुडकेश्वर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : वैद्यकीय तपासणीसाठी मेडिकलमध्ये आलेल्या तीन आरोपींनी हुडकेश्वर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. विविध राज्यांत मोठमोठ्या घरफोडी करणारे हे तीन आरोपी राजस्थानमधील रहिवासी असून ओमप्रकाश ऊर्फ ओम बिष्णोई, कैलासराम बिष्णोई, (रा. मिर्झापूर उत्तर प्रदेश) आणि ओमप्रकाश पांडे (बाडमेर, राजस्थान) अशी पोलिसांच्या तावडीतून फरार झालेल्या आरोपींची नावे आहेत.
ते कुख्यात घरफोडी करणारे आहेत. ओमप्रकाश आणि कैलास हे दोघे नातेवाईक आहेत. ते नंदनवन झोपडपट्टीत गल्ली नंबर १२ मध्ये सोनेकरच्या घरी भाड्याने राहत होते, तर पांडे ओंकारनगरातील पटेल नामक व्यक्तीच्या घरी भाड्याने राहत होता. दिवसा कुलूपबंद घर शोधायचे आणि रात्री घरफोडी करायची, अशी त्यांची कार्यपद्धत आहे. त्यांना हुडकेश्वर पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केली होती. कोर्टाने त्यांना २० डिसेंबरपर्यंत पीसीआर मंजूर केला होता. त्यामुळे वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना बुधवारी रात्री मेडिकलमध्ये नेण्यात आले. त्यांच्याभोवती चार पोलीस होते. त्या चौघांच्याही हातावर तुरी देऊन आरोपी फरार झाले. ते लक्षात आल्यानंतर बंदोबस्ताची जबाबदारी असलेल्या हुडकेश्वरच्या पोलिसांनी नियंत्रण कक्षात माहिती देऊन फरार आरोपींना अटक करण्यासाठी धावपळ सुरू केली. रात्री ८ वाजता ही घटना उघड झाल्यानंतर पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली.
वेगवेगळ्या कारणामुळे सतत चर्चेत राहणारे हुडकेश्वर पोलीस ठाणे या घटनेमुळे हादरले. ठाणेदार झावरे यांच्यासह मोठा पोलीस ताफा, परिमंडळ ४ चे उपायुक्त एस. चैतन्य यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी मेडिकलकडे धावले. त्यांनी मेडिकल परिसर आणि आजूबाजूच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणे सुरू केले.
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांसह अवघे सरकारच नागपुरात मुक्कामाला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या संबंधाने शहरभर पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त आहे. मेडिकलमध्येही मोठा पोलीस ताफा राहतो. अशास्थितीत तीन अट्टल गुन्हेगार पोलिसांना गुंगारा देऊन पळाल्याने सारेच अचंबित झाले आहे. आरोपींचे आणखी साथीदार फरार आहेत. त्यामुळे त्यांनी या तिघांना फरार होण्यासाठी मदत केली असावी, असाही संशय व्यक्त केला जात आहे.
दोषींचे होणार निलंबन
हुडकेश्वर पोलीस ठाण्याचा वादग्रस्त कारभार या प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. आरोपींसोबत चार-चार पोलीस असताना ते पळूनच कसे जाऊ शकतात. ज्यांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेले ते चारच्या चार पोलीस काय करीत होते, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. दरम्यान, त्यांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली. त्या पोलिसांना २४ तासात निलंबित केले जाऊ शकते, असे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाले आहेत.