नागपुरातील कुख्यात गुंड पिंटू ठवकर हत्याकांड :तिघांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 01:14 AM2018-12-02T01:14:51+5:302018-12-02T01:17:46+5:30
पाचपावलीतील कुख्यात गुंड भुऱ्या उर्फ पिंटू दिनू ठवकर (वय ३५) याला त्याचा गेम होणार आहे, याची कल्पना आली होती. त्यामुळे तो दोन महिन्यांपूर्वी गुजरातला पळून गेला होता. मात्र, तेथे त्याला मनासारखे काही करता येत नव्हते त्यामुळे नागपुरात परतला अन् अखेर त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी शुक्रवारी दुपारी त्याची निर्घृण हत्या केली. दरम्यान, त्याच्या हत्येतील अटक केलेल्या तीन आरोपींना पोलिसांनी आज न्यायालयात हजर करून त्याचा ६ डिसेंबरपर्यंत पीसीआर मिळवला. त्यांच्या फरार साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाचपावलीतील कुख्यात गुंड भुऱ्या उर्फ पिंटू दिनू ठवकर (वय ३५) याला त्याचा गेम होणार आहे, याची कल्पना आली होती. त्यामुळे तो दोन महिन्यांपूर्वी गुजरातला पळून गेला होता. मात्र, तेथे त्याला मनासारखे काही करता येत नव्हते त्यामुळे नागपुरात परतला अन् अखेर त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी शुक्रवारी दुपारी त्याची निर्घृण हत्या केली. दरम्यान, त्याच्या हत्येतील अटक केलेल्या तीन आरोपींना पोलिसांनी आज न्यायालयात हजर करून त्याचा ६ डिसेंबरपर्यंत पीसीआर मिळवला. त्यांच्या फरार साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
पाचपावलीत जुगार अड्डा चालविणारा तसेच अवैध दारू विकणारा कुख्यात पिंटूने लेंडी तलाव परिसरातील अनेकांचे जगणे मुश्किल केले होते. त्याचे कुणाशी जास्त वेळ पटत नव्हते. पिंटूच्या हत्येचा सूत्रधार सीताराम शाहू हा आधी पिंटूसोबतच राहायचा. तो त्याच्या गुन्हेगारीत आणि अवैध धंद्यात सहभागी होता. मात्र, पिंटूने त्याच्याशीही वैर घेतले होते. तो शाहू आणि त्याच्या साथीदारांना नेहमी मारहाण करून धमकी द्यायचा. त्यामुळे शाहू आणि साथीदारांनीही पिंटूची फिल्डींग लावली होती. ते लक्षात आल्यामुळे तो गुजरातमध्ये पळून गेला होता. मात्र, तेथे त्याच्या गुन्हेगारीला वाव नव्हता. कष्ट करून तो जगू शकत नव्हता. त्यामुळे तो नागपुरात पळून आला आणि त्याने येथे पुन्हा गुन्हेगारी सुरू केली. तो प्रतिस्पर्धी गुंडांसोबतही नेहमीच कुरबूर करायचा. त्यामुळे अनेक जण पिंटूवर टपून होते.
या पार्श्वभूमीवर, पिंटू शुक्रवारी दुपारी २. ३० च्या सुमारास कोर्टातून तारीख घेऊन गौरव ढवळे नामक साथीदारासह दुचाकीवर बसून अड्ड्याकडे जात होता. बारईपुरा, राऊत चौक शाळेजवळ येताच सीताराम मुलचंद शाहू (वय ३०, रा. नाईक तलाव), सागर ऊर्फ भांजा मंगल तेलंगे (वय १८, रा. मस्कासाथ), मंगल अरुण मांढरे (वय २०, रा. ढिवर मोहल्ला) आणि त्यांच्या साथीदारांनी पिंटूला घेरले. त्याच्यावर चाकू, तलवार, गुप्ती आणि कुकरीसारख्या घातक शस्त्रांचे २५ पेक्षा जास्त घाव घालत पिंटूच्या शरिराची चाळणी केली. त्याला ठार मारल्यानंतर आरोपी पळून गेले. पाचपावली पोलिसांनी धावपळ करून शाहू, तेलंगे आणि मांढरेसह अन्य एका अल्पवयीन आरोपीला अटक केली.
त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करून त्यांचा ६ डिसेंबरपर्यंत पीसीआर मिळवला. या गुन्ह्यात आणखी तीन ते चार आरोपी आहेत. पोलिसांना त्यांची नावेही कळली असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.
तो विकायचा नझूलची जागा
लेंडी तलावाच्या बाजूचा भाग खोलगट असल्यामुळे ती जागा पडित आहे. या खोलगट भागात झोपडपट्टी वसली आहे तर, काही जागा रिकामी आहे. ही जागा नझूलची आहे. त्या जागेवर माती-मुरूम टाकून पिंटू ती जागा समांतर करायचा आणि ती नझूलची जागा झोपडे टाकणारांना विकायचा. त्याच्या परवानगीशिवाय तेथे कुणी झोपडे टाकल्यास त्याच्याकडे धमकावून पिंटू १० हजारांपासून ५० हजारांपर्यंतची मागणी करायचा. पैसे दिले नाही तर झोपडे उपटून फेकायची धमकी द्यायचा.