तीन कृषी कायदे पुन्हा येऊ शकतात; कृषिमंत्र्यांचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 09:07 PM2021-12-24T21:07:19+5:302021-12-24T21:08:26+5:30
Nagpur News ‘सरकार निराश नाही. आम्ही एक पाऊल मागे हटलो आहोत. पुन्हा दोन पावले पुढे जाऊ,’ असे म्हणत मागे घेण्यात आलेले तीन कृषी कायदे भविष्यात पुन्हा परत येऊ शकतात, असे संकेत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी नागपुरात शुक्रवारी दिले.
नागपूर : गावपातळीवरील शेतकरी व एकूणच शेतीक्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने कृषी कायदे आणले होते; परंतु काही लोकांना ते पटले नाही. स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात पहिल्यांदाच नरेंद्र मोदी सरकारने हे क्रांतिकारक पाऊल उचलले होते. केंद्र सरकारला नाइलाजाने ते मागे घ्यावे लागले; परंतु ‘सरकार निराश नाही. आम्ही एक पाऊल मागे हटलो आहोत. पुन्हा दोन पावले पुढे जाऊ,’ असे म्हणत मागे घेण्यात आलेले तीन कृषी कायदे भविष्यात पुन्हा परत येऊ शकतात, असे संकेत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी नागपुरात शुक्रवारी दिले.
रेशीमबाग मैदान येथे आयोजित ॲग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून तोमर बोलत होते. ते म्हणाले, स्वातंत्र्यानंतर कृषिक्षेत्रात खूप काम झाले; परंतु खासगी गुंतवणूक झाली नाही. इतर क्षेत्रात खासगी गुंतवणूक आली. त्याचे फायदेही त्या त्या क्षेत्राला मिळाले; परंतु कृषिक्षेत्रात खासगी गुंतवणूक न झाल्याने तितका फायदा कृषिक्षेत्राला मिळू शकला नाही. जी काही गुंतवणूक झाली ती केवळ सरकारने केली. पायाभूत विकास झाला तोसुद्धा शहर, तालुकास्तरावर, गावपातळीवर. शेतकऱ्यांना त्याचा काहीही लाभ मिळू शकला नाही, असेही त्यांनी सांगितले.