नागपूर विमानतळावर साडेतीन किलो सोने जप्त; यूपीतील मोहम्मद अहमद जेरबंद

By नरेश डोंगरे | Published: September 29, 2023 09:08 PM2023-09-29T21:08:01+5:302023-09-29T21:08:20+5:30

सीमा शुल्क विभागाने तस्करीचा प्रयत्न उधळला

Three and a half kilos of gold seized at Nagpur airport; Mohammed Ahmed detained from UP | नागपूर विमानतळावर साडेतीन किलो सोने जप्त; यूपीतील मोहम्मद अहमद जेरबंद

नागपूर विमानतळावर साडेतीन किलो सोने जप्त; यूपीतील मोहम्मद अहमद जेरबंद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दोन कोटी रुपये किंमतीचे साडेतीन किलो सोने जप्त करण्यात आले. सोन्याची ही खेप घेऊन येणाऱ्या आरोपीचे नाव मोहम्मद अहमद असून तो उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. त्याला अटक करण्यात आली असून, सीमा शुल्क विभागाने आज भल्या पहाटे ही धडाकेबाज कारवाई केली.

एअर अरेबियाचे जी ९- ४१५ विमान शारजाह येथून आज पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी नागपूर विमानतळावर उतरले. त्यातून आलेल्या मोहम्मद अहमद नामक प्रवाशाला ताब्यात घेऊन सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या सामानाची तपासणी केली. त्याने सोबत आणलेल्या कॉफी मेकर मशिनमध्ये बेरिंगच्या आकाराचे १७४८ - १७४८ ग्राम वजनाचे सोन्याचे दोन रिंग आढळले. या संबंधाने विचारणा केली असता अहमद गडबडला. तो असंबंध उत्तरे देत असल्यामुळे त्याला अटक करून सोने जप्त करण्यात आले.

आयुक्त अविनाश थेटे आणि अतिरिक्त आयुक्त पीयूष भाटी यांच्या देखरेखित सहायक आयुक्त चरणजीत सिंह यांच्या नेतृत्वात नागपूर एअर कस्टम्स युनिट (एसीयू) तसेच एअर इंटेलिजेंस युनिट (एआययू)चे सहा. आयुक्त लक्ष्मीनारायण, अधीक्षक त्रीदीप पॉल, प्रकाश कापसे, राजेश खापरे, निरीक्षक आदित्य बैरवा, प्रियंका मीना, हवलदार चंदू धांडे आणि अनुराग परिहार यांनी ही कारवाई केली.

१० दिवसांतील दुसरी कारवाई

विशेष म्हणजे, १० दिवसांपूर्वी अर्थात गणेशोत्सवाला प्रारंभ होत असताना अशाच प्रकारे तस्करी करून आणलेले ८७.१४ लाखांचे १६९७ ग्राम सोने जप्त करण्यात आले होते. हे सोने तस्करी करणारे कतर एअरवेजच्या विमानाने दोहा येथून नागपुरात आले होते. त्यांनी पेस्टच्या स्वरूपात सोने आणले होते. आता दुप्पट पेक्षा जास्त अर्थात साडेतीन किलो सोने जप्त करण्यात आले आहे.

सोन्याची खेप घेणारा पसार
सोने तस्करीच्या आरोपात पकडला गेलेला मोहम्मद अहमद याने तपास अधिकाऱ्यांकडे आपण निर्दोष असल्याचा कांगावा केल्याचे समजते. त्याला दुसऱ्या तस्कराने 'हे गिफ्ट' नागपूर विमानतळावर एकाला देण्याची विनंती केली होती. त्यानुसार, तो हे गिफ्ट (कॉफी मेकर)घेऊन आला. त्याचा संशय आल्यानंतर कॉफी मेकरचा प्लग ईलेक्ट्रीक बोर्डात लावला असता स्पार्किंग झाले. त्यामुळे ती मशिन खोलून तपासली असता त्यात सोन्याचे बेरिंग कम रिंग आढळले.

विशेष म्हणजे, ज्यावेळी ही कारवाई सुरू होती त्याचवेळी विमानतळावर एक 'गुरूजी' दिल्लीहून आले. त्यांना घेण्यासाठी मोठ्या संख्येत त्यांचे शिष्य आणि समर्थक नागपुरात आले होते. या गर्दीत तस्करीच्या सोन्याची खेप घेण्यासाठी 'तो' आला होता. मात्र, बराच वेळ होऊन नमूद वर्णनाचा प्रवासी विमानतळाबाहेर आला नसल्याने त्याला शंका आली. त्यामुळे तस्करीचे सोने घेण्यासाठी आलेला तेथून पसार झाला.

Web Title: Three and a half kilos of gold seized at Nagpur airport; Mohammed Ahmed detained from UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.