साडेतीन वर्षाच्या मुलीचे रेल्वे स्थानकावरून अपहरण; पोलिसांची सतर्कता, 'अशी' केली सुटका
By नरेश डोंगरे | Published: June 17, 2023 02:09 PM2023-06-17T14:09:21+5:302023-06-17T14:11:53+5:30
दोन तासात मुलगी आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात
नागपूर : पित्याचे मुलीकडे दुर्लक्ष झाल्याचे पाहून एका आरोपीने साडेतीन वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण केले. आज सकाळी १० च्या सुमारास नागपुरातील इतवारी रेल्वे स्थानकाच्या उत्तरेकडील बुकिंग काउंटरवर हा प्रकार घडला. पोलिसांनी लगेच सतर्कता दाखवल्यामुळे दोन तासातच आरोपी आणि मुलीला पोलिसांना शोधून काढण्यात यश मिळाले.
प्राथमिक माहितीनुसार, नागपुरातील एक व्यक्ती आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलीला घेऊन नागपुरातील इतवारी रेल्वे स्थानकावर सकाळी दहाच्या सुमारास आले. तिकीट काढण्यासाठी ते रांगेत लागले आणि गर्दी असल्यामुळे त्यांनी मुलीला कडेवरून खाली उतरवले. तिकीट काढत असताना त्यांचे दुर्लक्ष झाल्याची संधी साधून एका भामट्याने त्या चिमुकलीला उचलून तिथून पळ काढला. मुलगी दिसत नसल्याचे पाहून पित्याने आरडाओरड केली आणि लगेच रेल्वे पोलिसांना माहिती दिली.
एपीआय डोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या घटनेची लगेच दखल घेत शहर पोलीस तसेच रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि मुलीच्या शोधासाठी धावपळ सुरू केली. दरम्यान, आरोपी आणि अपहृत मुलीच्या शोधासाठी नागपूर रेल्वे स्थानकावर पोलीस निरीक्षक मनीषा काशीद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दबा धरून आरोपीला दोन अडीच तासातच शोधून काढण्यात यश मिळवले. वृत्त लीहिस्तोवर मुलीला सुखरूप स्थितीत पिताच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीची पोलिसांकडून चौकशी सुरू असल्यामुळे सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.