कारवाईचा धाक दाखवून साडेतीन लाख उकळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 11:54 PM2018-07-07T23:54:50+5:302018-07-07T23:55:43+5:30
मद्यविक्रेत्याला कारवाईचा धाक दाखवून साडेतीन लाख रुपये उकळल्यानंतर पुन्हा एका लाखाची खंडणी मागणाऱ्या चार तोतया पोलिसांना कोतवाली पोलिसांनी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मद्यविक्रेत्याला कारवाईचा धाक दाखवून साडेतीन लाख रुपये उकळल्यानंतर पुन्हा एका लाखाची खंडणी मागणाऱ्या चार तोतया पोलिसांना कोतवाली पोलिसांनी अटक केली. मोहम्मद फैजल शकील पठाण, रौनक विठ्ठलराव निखारे (वय २६), आकाश ऊर्फ गौलू ताराचंद गौर (वय २२) आणि शेख नूर बब्बूभाई शेख (वय ५२) अशी त्यांची नावे आहेत.
शेख नूर देशपांडे ले-आऊटमध्ये राहतो. उर्वरित तिघे श्रीनगर, नंदनवनमध्ये राहतात. यातील तक्रारकर्ते विष्णू धनराज अडवाणी (वय ५५) महालमधील बडकस चौकाजवळच्या नागोबा गल्लीमध्ये राहतात. त्यांचा नागपूर तसेच उमरेड मार्गावर वाईन शॉप आणि ढाबा आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या एका कारवाईत अडवाणीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरोपी फैजल, रौनक, आकाश आणि शेख नूर हे ५ मे च्या रात्री ८ वाजता अडवाणीच्या ढाब्यावर पोहचले. आम्ही मूल पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे सांगून त्यांनी अडवाणींना अटक करण्याचा धाक दाखवला. अटक न करण्याच्या बदल्यात आरोपींनी ५ लाखांची मागणी केली. अटक टाळण्यासाठी अडवाणींनी ५ मे ते १५ जूनपर्यंत आरोपींना ३ लाख, ५५ हजार रुपये दिले. त्यानंतरही आरोपींनी अडवाणींना पुन्हा एक लाख रुपये देण्यासाठी वेठीस धरले होते. ते वारंवार फोन करीत होते. त्यामुळे अडवाणींना संशय आला. त्यांनी कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदवली. हवालदार समाधान गीते यांनी कलम १७०, ३८४, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. चौकशीअंती आरोपींनी ज्या मोबाईला वापर केला होता, त्या क्रमांकाच्या आधारे शुक्रवारी तिघांना तर आज आकाश गौर याला पोलिसांनी अटक केली. पुढील तपास सुरू आहे.