नागपूरच्या पोक्सो न्यायालयात आरोपीला साडेतीन वर्षांचा सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 10:53 PM2017-12-15T22:53:39+5:302017-12-15T22:56:02+5:30
काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १५ वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. टी. भालेराव यांच्या न्यायालयाने एका आरोपीला साडेतीन वर्षांचा सश्रम कारावास आणि ७५० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
ऑनलाईन लोकमत
नागपूर : काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १५ वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. टी. भालेराव यांच्या न्यायालयाने एका आरोपीला साडेतीन वर्षांचा सश्रम कारावास आणि ७५० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
विष्णू श्रीराम मरोलिया (२९), असे आरोपीचे नाव असून तो काटोल भागातीलच रहिवासी आहे.
पीडित मुलगी ही आपल्या घराच्या अंगणात आईसोबत झोपलेली असताना २५ जून २०१५ रोजी रात्री १२.३० ते २.३० वाजताच्या दरम्यान आरोपीने तिचा दोन वेळा विनयभंग केला. पीडित मुलीच्या तक्रारीवरून काटोल पोलिसांनी भादंविच्या ३५४(अ), ४५१ आणि लैंगिक अपराधांपासून बाल संरक्षण कायद्याच्या कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला २८ जून २०१५ रोजी अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक सचिन राठोड यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला पोक्सोच्या कलम ७, ८ अन्वये साडेतीन वर्षे सश्रम कारावास, ५०० रुपये दंड, भादंविच्या ४५१ कलमांतर्गत २ वर्षे सश्रम कारावास, २५० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील दीपिका गवळी यांनी काम पाहिले. पोलीस उपनिरीक्षक डी. एन. मात्रे, सहायक फौजदार अरुण भुरे, प्रमोद पाटील, रमेश भुसारी आणि हेड कॉन्स्टेबल रमेश नवले यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.