विदर्भात पहिल्या दिवशी तीन अर्ज; सेनेच्या यादीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:28 AM2019-03-19T10:28:16+5:302019-03-19T10:28:44+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी सोमवारी अधिसूचना जारी झाली. यात विदर्भातील वर्धा, रामटेक, नागपूर, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर व यवतमाळ-वाशिम या सात मतदारसंघाचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी सोमवारी अधिसूचना जारी झाली. यात विदर्भातील वर्धा, रामटेक, नागपूर, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर व यवतमाळ-वाशिम या सात मतदारसंघाचा समावेश आहे. मात्र प्रमुख पक्षांनी बऱ्याच ठिकाणी उमेदवार जाहीर केलेले नाहीत. यवतमाळातून दोन तर नागपूरमधून एकाने अर्ज दाखल केला.
पहिल्या दिवशी १२७ जणांनी २५० अर्ज ताब्यात घेतले. काँग्रेसकडून नागपुरातून नाना पटोले व गडचिरोलीतून डॉ. नामदेव उसेंडी यांच्याच नावांची घोषणा झाली आहे. शिवसेनेची यादी जाहीर झाली नसली तरी अमरावतीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी यवतमाळातून भावना गवळी, अमरावतीतून आनंदराव अडसूळ, रामटेक-कृपाल तुमाने व बुलडाण्यातून प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारीचे सुतोवाच केले होते. भंडाऱ्यातून विदर्भ निर्माण महासंघाने देवीदास लांजेवार यांना उमेदवारी दिली.
वंचित बहुजन आघाडीने वर्धासाठी धनराज वंजारी, गडचिरोली डॉ. रमेश गजबे तर चंद्रपुरातून राजेंद्र महाडोळे यांची घोषणा केली. बुलडाण्यात दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिल रोजी मतदान आहे. तिथे राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे, सेनेचे प्रतापराव जाधव तर वंचित बहुजन आघाडीचे आ. बळीराम शिरसकार रिेगणात असतील.
कुणी भरला अर्ज
नागपूरसाठी ‘एमआयएम’चे शकील अहमद यांनी अर्ज भरला. रामटेकसाठी एकही अर्ज आला नाही. यवतमाळ-वाशिममधून प्रेमासाई महाराज व रमेश पवार यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला.