लाचखाेर तलाठ्यासह तिघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:06 AM2021-06-30T04:06:54+5:302021-06-30T04:06:54+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क माैदा/रेवराल : शेतीचे फेरफार करण्यासाठी सात हजार रुपयाची लाच मागणाऱ्या तलाठी, काेतवाल व अन्य एकास सात ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा/रेवराल : शेतीचे फेरफार करण्यासाठी सात हजार रुपयाची लाच मागणाऱ्या तलाठी, काेतवाल व अन्य एकास सात हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील तारसा येथे मंगळवारी (दि. २९) दुपारी करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये तलाठी संजय भगवान पडवाळ (३१, रा. तारसा, ता. माैदा), काेतवाल किशोर बिसन वानखेडे (५२, रा. चाचेर, ता. माैदा) व लक्ष्मीनारायण रामचंद्र पोटभरे (४१, रा. मौदा) या तिघांचा समावेश आहे. तक्रारकर्त्यास त्यांच्या शेतजमिनीचे फेरफार करावयाचे असल्याने त्यांनी तलाठी संजय पडवाळ यांच्याकडे रीतसर अर्ज केला हाेता. या कामासाठी तलाठ्याने त्यांना सात हजार रुपयाची मागणी केली हाेती.
लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी यासंदर्भात साेमवारी (दि. २८) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या भंडारा कार्यालयात तक्रार केली हाेती. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी या तक्रारीची खातरजमा करून मंगळवारी दुपारी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे लक्ष्मीनारायण पाेटभरे याचे तक्रारकर्त्याकडून सात हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. ही लाच संजय पडवाळ व किशाेर वानखेडे याच्या सांगण्यावरून स्वीकारल्याचे पाेटभरे याने सांगताच अधिकाऱ्यांनी त्या दाेघांना ताब्यात घेत तिघांना अटक केली.
याप्रकरणी माैदा पाेलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नाेंदविण्यात आला. ही कारवाई एसीबीच्या पाेलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीचे पाेलीस उपअधीक्षक महेश चाटे, पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, हवालदार संजय कुरंजेकर, रोशन गजभिये, राजेंद्र कुरुडकर, कोमल बनकर, सुनील हुकरे, कुणाल कडव, दिनेश धार्मिक यांच्या पथकाने केली.