गांजा तस्करीतील तीन आरोपींना अटक ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:07 AM2021-07-15T04:07:46+5:302021-07-15T04:07:46+5:30
नागपूर : एकामागून एका चोरी आणि तस्करीच्या प्रकरणांचा उलगडा करीत असलेल्या लोहमार्ग पोलिसांनी रेल्वेगाडीत बेवारस स्थितीत आढळलेल्या गांजाच्या तस्करीतील ...
नागपूर : एकामागून एका चोरी आणि तस्करीच्या प्रकरणांचा उलगडा करीत असलेल्या लोहमार्ग पोलिसांनी रेल्वेगाडीत बेवारस स्थितीत आढळलेल्या गांजाच्या तस्करीतील तीन आरोपींना दिल्ली येथून अटक केली आहे. पीएनआरच्या यादीवरून आरोपींची माहिती मिळाल्यामुळे आरोपींचा शोध लागला आहे.
महिनाभराच्या अथक परिश्रमानंतर लोहमार्ग पोलिसांना आरोपीचा सुगावा लागला आहे. रणजित सिंह गुरुदयाल सिंह (३३), गुरुदेव सिंह भजन सिंह (३२) आणि जसविंदर बलदेव सिंह (३६) अशी आरोपींची नावे आहेत. तिघेही दिल्लीतील नागलोई परिसरातील निहाल विहार येथे राहतात. रेल्वे सुरक्षा दलाने ८ जूनला रेल्वेगाडी क्रमांक ०२८५१ विशाखापट्टणम-हजरत निजामुद्दीन संपर्कक्रांती एक्स्प्रेसच्या एस २ कोचमध्ये १ लाख २७ हजार ८७० रुपयांचा गांजा बेवारस स्थितीत पकडला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास लोहमार्ग पोलिसांकडे देण्यात आला. यापूर्वी लोहमार्ग पोलिसांनी ब्राऊन शुगरच्या तस्करीत गोंदिया आणि बजेरिया येथून आरोपींना अटक केली होती. मादक पदार्थांच्या तस्करीत पहिल्यांदा गुन्हेगार हाती लागल्याची घटना घडली आहे.
........
‘पीएनआर’वरुन लागला शोध
लोहमार्ग पोलिसांना गांजाच्या बॅगमध्ये एक चिठ्ठी आढळली. ही चिठ्ठी दिल्लीतील निहाल विहार येथे बँक खाते उघडण्याची रसीद होती. त्या चिठ्ठीच्या आधारे लोहमार्ग पोलीस सचिन ठोंबरे यांनी पीएनआरच्या मदतीने एस २ कोचमधील प्रवाशांची यादी काढली. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांचे पथक दिल्लीला पोहोचले. तेथे एका प्रॉपर्टी डीलरच्या मदतीने निहाल विहारचा पत्ता शोधला. तिथे या प्रकारच्या गुन्ह्यांशी संबंधित गुन्हेगारांच्या अनेक वस्त्या आहेत. येथील गुरुद्वारापासून आजूबाजूच्या नागरिकांकडे चौकशी केली असता चार ते पाच जणांची माहिती मिळाली. लोहमार्ग पोलिसांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता रणजितने खाते उघडल्याचे समजले. परंतु तो पासबुक घेण्यासाठी आला नसल्याचे पोलिसांना समजले.
बँकेत लावला सापळा
लोहमार्ग पोलिसांना बँकेतून रणजितचा मोबाईल क्रमांक मिळाला. परंतु दिल्लीसारख्या शहरात मोबाईल ट्रेसिंग करणे मोठे आव्हान होते. अशा स्थितीत पोलिसांनी बँकेत सापळा लावला. बँक व्यवस्थापकाला रणजितला मोबाईलवरून पासबुक आणि एटीएम घेण्यासाठी बोलविण्यास सांगितले. काही तासातच रणजित बँकेत आला. इशारा मिळताच लोहमार्ग पोलिसांनी त्यास अटक केली. त्याने आपल्या दोन साथीदारांची नावे सांगितल्यानंतर त्यांनाही अटक करून नागपुरात आणण्यात आले.
...................