कोट्यवधींच्या 'ट्रेड मनी' फसवणूक प्रकरणात सूत्रधारासह तिघांना बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2022 12:33 PM2022-02-22T12:33:56+5:302022-02-22T12:38:20+5:30
आरोपी ट्रेड मनी आणि माय एम ट्रेडच्या नावाने फसवणूक करीत होते. दोन्ही कंपनीची अनेक शहरात कार्यालये आहेत. त्याचे मुख्य कार्यालय चंदीगडमध्ये आहे.
नागपूर : हॉली डे पॅकेजमध्ये गुंतवणूक करून १८ महिन्यात दुप्पट रक्कम परत करण्याची बतावणी करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ट्रेड मनी सूत्रधारासह तीन आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
आरोपींत विनोद दादाजी उपरे (५०, खामला), शैलेश शंकर तल्हार (४७) आणि मोहन धनलाल राणा (४८, बेसा) यांचा समावेश आहे. आर्थिक गुन्हे शाखेने १५ फेब्रुवारीला फसवणूक करणाऱ्या ट्रेड मनी कंपनीचे संचालक विनोद उपरेसह ११ जणांविरुद्ध फसवणूक तसेच एमपीआयडीनुसार गुन्हा दाखल केला.
उपरेने २०२० मध्ये ट्रेड मनी कंपनी सुरू केली होती. एमएलएम कंपनीच्या धर्तीवर आरोपी नागरिकांना शिकार बनवित होते. दीड हजार रुपयात एक आयडी देण्यात येत होती. गुंतवणूकदारांना आलिशान हॉटेलमध्ये दोन रात्री, तीन दिवसांचे हॉली डे पॅकेज मोफत देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत होते. हॉली डे पॅकेज न घेतल्यास गुंतवणूक केलेल्या रकमेनुसार तसेच नवे सदस्य तयार केल्यावर प्रोत्साहन बोनस देण्याची बतावणी करण्यात येत होती.
सुरुवातीला आरोपींनी गुंतवणूकदारांना हॉली डे पॅकेज आणि प्रोत्साहन बोनस दिला. त्यामुळे नागरिक आरोपींकडे गुंतवणूक करू लागले. त्यानंतर आरोपी टाळाटाळ करू लागले. त्यामुळे पीडित नागरिकांनी तक्रार दाखल केली. आरोपी ट्रेड मनी आणि माय एम ट्रेडच्या नावाने फसवणूक करीत होते. दोन्ही कंपनीची अनेक शहरात कार्यालये आहेत. त्याचे मुख्य कार्यालय चंदीगडमध्ये आहे. प्राथमिक तपासात २४ लाखाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. ही रक्कम कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात अटक केलेल्या मोहन राणाची पत्नी इंदूसह पुरुषोत्तम चाचरे, मंगला अंबोलकर, ऋषिकेश अंबोलकर, प्रमोद डोंगर, अतुल डोंगरे, समीर जैन यांचा पोलीस शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची २५ फेब्रुवारीपर्यंत कोठडी मिळविण्यात आली आहे. आर्थिक शाखेने प्रकरणातील पीडितांना तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे. प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विक्रांत सगणे, नरेश बढेल, सुनील मडावी, प्रीती धुर्वे करीत आहेत.