बिल्डरला खंडणी मागणाऱ्या पत्रकारासह तिघांना अटक; वाहनांसह माेबाईल जप्त
By जितेंद्र ढवळे | Published: June 6, 2024 11:36 PM2024-06-06T23:36:29+5:302024-06-06T23:36:56+5:30
पाेलिस उपायुक्तांच्या विशेष पथकाची कारवाई
(नागपूूर) कामठी : नागपूर शहरातील बिल्डरला पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पत्रकारासह तिघांना पाेलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्या विशेष पथकाने अटक केली. त्यांच्याकडून कार, माेटारसायकल व माेबाइल फाेन जप्त केले आहेत. ही कारवाई कामठी-कळमना मार्गावरील मरारटाेली परिसरात गुरुवारी (दि. ६) दुपारी २.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
वीरकुमार दिनसिंह (३०, रा. संताजीनगर, कन्हान, ता. पारशिवनी), शेख हबीब शेख रहमतुल्ला (३४, रा. पटेलनगर, कन्हान, ता. पारशिवनी) व सय्यद रिजवान हैदर सय्यद अस्वर अली रिजवी (५०, रा. सैलाबनगर, कामठी) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. सचिन गोपाल गुप्ता (४५, रा. जीपीओ चाैक, सिव्हिल लाइन, नागपूर) हे केसर लँड बिल्डर्स नामक फर्मचे मालक आहेत. वीरकुमारसह अन्य दाेघे न्यू आवाज न्यूज या यू-ट्यूब चॅनेलचे प्रतिनिधी आहेत.
सचिन गुप्ता यांनी कन्हान शहरातील पांदण रस्त्यावर ले-आउट टाकून भूखंड विकल्याचा आराेप करीत तिघांनी त्यांना १० लाख रुपयांची मागणी केली हाेती. त्यामुळे सचिन यांनी १७ मे राेजी तिघांच्या विराेधात कामठी (नवीन) पाेलिस ठाणे व पाेलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्याकडे तक्रार केली हाेती. पैसे मागणीचा तगादा वाढल्याने पाेलिसांनी तीन दिवसांपासून सापळा रचला हाेता. तिघेही गुरुवारी दुपारी मरारटाेली भागात आले. त्यांनी सचिन गुप्ता यांच्याकडून पाच लाख रुपये स्वीकारताच पाेलिसांनी तिघांनाही ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी भादंवि ३८४, ३८६, ५०६, ५०४, ३४ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.
शासकीय अधिकारीही ब्लॅकमेलिंगचे बळी
पाेलिस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सचिन गुप्ता यांनी वीरकुमारला पाच लाख रुपये असलेली नाेटांची पिशवी दिली. त्यात एक लाख रुपयांच्या नाेटा असली तर चार लाख रुपयांच्या नाेटा नकली हाेत्या. पाेलिसांनी वीरकुमारची एमएच-४९/यू-६८४५ क्रमांकाची हाेंडा सिटी कार, इतर दाेन आराेपींची एमएच-४०/एवाय-३४६२ क्रमांकाची माेटारसायकल व तीन माेबाइल फाेन जप्त केले. वीरकुमारने यापूर्वी अनेकांकडून खंडणी वसूल केली आहे. यात शासकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्याच्या विराेधात कन्हान पाेलिस ठाण्यात गुन्ह्यांची नाेंद आहे, अशी माहिती तपास अधिकारी तथा पाेलिस उपनिरीक्षक राहुल साबळे यांनी दिली. त्याच्याकडून ब्लॅकमेलिंगच्या इतर घटना उघड हाेण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.