नागपुरात मध्य प्रदेशमधील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांसह तिघांना पिस्तुलांसह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 08:29 PM2018-08-04T20:29:54+5:302018-08-04T20:33:09+5:30

मध्य प्रदेशमधील एका मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांसह तिघांना नंदनवनमध्ये अटक करून पोलिसांनी त्याच्याजवळून चार पिस्तूल तसेच पाच जिवंत काडतूस जप्त केले.

Three arrested with pistols, including the most wanted criminals in Madhya Pradesh | नागपुरात मध्य प्रदेशमधील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांसह तिघांना पिस्तुलांसह अटक

नागपुरात मध्य प्रदेशमधील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांसह तिघांना पिस्तुलांसह अटक

Next
ठळक मुद्देचार पिस्तूल, पाच काडतूस जप्त : गुन्हे शाखेची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य प्रदेशमधील एका मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांसह तिघांना नंदनवनमध्ये अटक करून पोलिसांनी त्याच्याजवळून चार पिस्तूल तसेच पाच जिवंत काडतूस जप्त केले. मोहसिन अन्सारी ऊर्फ राजा बदरुद्दीन अन्सारी (वय ३३, रा. एकलेरा खेलनगर, परासिया, जि. छिंदवाडा, मध्य प्रदेश), सुरेश मुधकर यादव (वय ४०, रा. पेलकीपुरा कामठी) आणि निखिल नरेश चौकसे (वय ३५, रा. जेपीनगर, कामठी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट ५ मधील पोलीस पथकाने शुक्रवारी ही कामगिरी बजावल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.
मोहसिन अन्सारी हा मध्य प्रदेशातील कुख्यात गुंड असून, त्याने चार महिन्यांपूर्वी छिंदवाड्यात एका गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर तो छिंदवाड्यातून फरार झाला. त्याच्याविरुद्ध हत्या, बलात्कार, लुटमार तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो मध्य प्रदेश पोलिसांना मोस्ट वॉन्टेड होता. नंदनवनमधील दिघोरीतील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये तो भाड्याच्या खोलीत राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या युनिट ५ मधील पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी नंदनवनमध्ये छापामारी करून आरोपी अन्सारीला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल, एक देशीकट्टा आणि पाच काडतूस जप्त करण्यात आले. त्याने प्राथमिक चौकशीत त्याचा साथीदार सुरेश यादव याचेही नाव सांगितले. त्यावरून पोलिसांनी त्यालाही अटक केली. पोलिसांनी यादवकडून एक पिस्तूल आणि मॅगझिन जप्त केले. या दोघांची दोन दिवस चौकशी केली असता त्यांनी मोहखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालकाला मारहाण करून लुटलेली पाच लाखांची बोलेरो पिकअप व्हॅन तसेच गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकलही पोलिसांच्या हवाली केली. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, त्यासाठी गुन्हे शाखेचे पोलीस पथक छिंदवाड्याला रवाना करण्यात येणार असल्याचेही उपायुक्त कदम यांनी पत्रकारांना सांगितले. यावेळी गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त संजीव कांबळे, तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे उपस्थित होते.

कबुतराच्या कोंड्यात पिस्तुल
कामठीच्या जेपीनगरात राहणारा निखिल नरेश चौकसे (वय ३५) याच्याकडे अग्निशस्त्र असल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्याकडे छापा मारून एक पिस्तूल आणि मॅगझिन जप्त केले. त्याने हे पिस्तूल कबुतर ठेवण्याच्या कोंड्यात लपवून ठेवले होते. निखिल हा गुन्हेगारी वृत्तीचा असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वीही असाच शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे.
विशेष म्हणजे, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गेल्या सात महिन्यात अशा प्रकारे विविध गुन्हेगारांकडून २५ पिस्तूल जप्त केले आहेत. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त संजीव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय प्रमोद घोंगे, विक्रांत सगणे, उपनिरीक्षक आशिष चेचरे, सुनील राऊत, हवलदार राजेश यादव, प्रशांत लाडे, मंगेश लांडे, कन्हैया लिल्हारे, नामदेव टेकाम, अरुण चांदणे, रवी शाहू, नरेंद्र ठाकूर, अजय बघेल, मंगेश पराये, प्रीतम ठाकूर, उत्कर्ष राऊत आणि फराज खान यांनी ही कामगिरी बजावली.

Web Title: Three arrested with pistols, including the most wanted criminals in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.