मनुस्मृतीविरोधात तिघांचा आत्मदहनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2016 03:07 AM2016-03-20T03:07:08+5:302016-03-20T03:07:08+5:30
मानवी मूल्य पायदळी तुडवणाऱ्या ‘सार्थश्री मनुस्मृती’ ग्रंथावरील बंदीची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली नाही..
१५ दिवसांची मुदत संपूनही शासन गप्प का ?
नागपूर : मानवी मूल्य पायदळी तुडवणाऱ्या ‘सार्थश्री मनुस्मृती’ ग्रंथावरील बंदीची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली नाही तसेच प्रकाशकावर फौजदारी कारवाई झाली नाही तर कोणत्याही क्षणी रिझर्व्ह बँक समोरच्या संविधान चौकात आत्मदहन करण्याचा इशारा तेली समाज महासंघाच्या तीन नेत्यांनी दिला आहे.
डॉ. राजेंद्र पडोळे, प्रा. डॉ. रमेश पिसे आणि विलास काळे, अशी इशारा देणाऱ्या नेत्यांची नावे आहेत.
या तिघांनी १५ दिवसांपूर्वी पत्रपरिषद घेऊन आत्मदहन करण्याबाबत निर्वाणीचा इशारा दिला होता. या ग्रंथात बहुजन समाजाच्या तेली, सोनार, कलार, न्हावी आदी जाती आणि महिलांबाबत हीन उल्लेख आहे. जाती समुदायात विषाची बीजे पेरून वैमनस्य निर्माण करणाऱ्या या ग्रंथावर १९९३ मध्ये २२ वर्षांपूर्वी राज्य सरकारने बंदी घातली होती. मूळ संस्कृत भाषेतील या गं्रथाचे मराठीत भाषांतर विष्णूशास्त्री बापट यांनी केलेले आहे.
ते आता हयात नाहीत. बंदी असतानाही पुणे येथील रहिवासी राजेश रघुवंशी यांनी या ग्रंथाचे पुनर्प्रकाशन करून जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, गं्रथावरील बंदीची पुन्हा अंमलबजावणी करून होत असलेली विक्री थांबवून हे ग्रंथ जप्त करण्यात यावे, आदी मागण्या पत्रपरिषदेद्वारे करण्यात आल्या होत्या. तसेच शासनाकडे निवेदने पाठविण्यात आली होती. १५ दिवसांची मुदत संपूनही राज्य सरकारकडून कोणतीही हालचाल दिसत नसल्याने आम्ही चालू आठवड्यात कोणत्याही क्षणी आत्मदहन करू, असा पुनरुच्चार तेली समाज महासंघाचे सचिव डॉ. राजेंद्र पडोळे यांनी केला आहे.(प्रतिनिधी)