दुपारी अडीचनंतर बस स्थानकात तीन बॉम्ब फुटणार; चिठ्ठीने फोडला पोलीस, महामंडळाला घाम
By नरेश डोंगरे | Published: April 8, 2024 10:26 PM2024-04-08T22:26:38+5:302024-04-08T22:27:02+5:30
गेल्या वेळी वाचले, आता वाचवता येत असेल तर वाचवा...
नागपूर : दुपारी २.३० वाजता नंतर एसटी बस स्थानकात बॉम्बस्फोटाची मालिका होणार आहे. गेल्या वेळी वाचले आता वाचवता येत असेल तर वाचवा, अशी धमकी देणारी चिठ्ठी एका समाजकंटकाने बसमध्ये सोडली. या 'चिठ्ठी-बॉम्ब'ने एसटी महामंडळ आणि पोलिसांना सोमवारी दुपारी चांगलाच घाम फोडला होता.
गोंदिया आगाराची बस क्रमांक एमएच ४० / एन ८५०१ आज दुपारी गोंदियाहून नागपूरला पोहचली. दुपारी २.३० च्या नंतर ती परत भंडारा मार्गे गोंदियाला जाणार होती. त्यामुळे चालकाने बस फलाटावर लावताच गोंदियाकडे जाणारे प्रवासी बसमध्ये शिरू लागले. दोन महिला आणि एक पुरूष बसच्या मागच्या आसनावर बसले असता त्यांना एका सीटवर एक चिठ्ठी आढळली.
त्यात ८ एप्रिलला दुपारी २.३० वाजतानंतर गणेशपेठ बसस्थानकात ३ बॉम्ब फुटणार आहेत. एचबी टाऊन आणि पारडी दरम्यानसुद्धा बॉम्ब स्फोट होणार आहे. गेल्या वेळी वाचले. यावेळी वाचवा, असा मजकूर या चिठ्ठीत हिंदीत लिहून होता. तो वाचून संबंधित प्रवाशाने लगेच बसचालक-वाहकाला माहिती दिली. त्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना कळविले. अधिकाऱ्यांनी लगेच बस खाली करून घेतली आणि पोलिसांना माहिती दिली. ऐन लोकसभा निवडणूकीची धावपळ सुरू असताना घडलेल्या या घडामोडीमुळे एसटीच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनाही चांगलाच घाम फुटला.
कमालीची तत्परता दाखवत संबंधित अधिकाऱ्यांनी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाच्या (बीडीडीएस) डॉग स्कॉडला बोलवून घेतले. बस आणि बस स्थानक परिसराचा कानाकोपरा शोधून काढल्यानंतर काहीही संशयास्पद आढळले नाही. त्यामुळे बीडीडीएस, पोलीस आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास टाकला.
समाजकंटकाकडून जाणीवपूर्वक उपद्रव
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी गणेशपेठ आगारात एका बसमध्ये अग्निशमन यंत्र ठेवून बॉम्ब असल्याची अफवा उडविण्यात आली होती. यामुळे त्यावेळीसुद्धा प्रचंड खळबळ निर्माण झाली होती. आता हा प्रकार घडल्याने कुणी समाजकंटक प्रवाशांमध्ये दहशत पसरविण्यासाठी जाणीवपूर्वक हा उपद्रव करत असावा, असा संशय निर्माण झाला आहे.