तीन भावांची निर्दोष सुटका
By admin | Published: September 19, 2016 02:47 AM2016-09-19T02:47:06+5:302016-09-19T02:47:06+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका हत्याप्रकरणात मयताचे मृत्यूपूर्व बयान संशयास्पद ठरवून तीन सख्ख्या भावांना निर्दोष सोडण्याचा आदेश दिला.
हायकोर्ट : मृत्यूपूर्व बयान ठरले संशयास्पद
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका हत्याप्रकरणात मयताचे मृत्यूपूर्व बयान संशयास्पद ठरवून तीन सख्ख्या भावांना निर्दोष सोडण्याचा आदेश दिला.
विनोद (२४), धर्मेंद्र ऊर्फ धम्मा (२७) व हरिश्चंद्र बाबुराव उमरेडकर (३२) अशी आरोपींची नावे असून ते नंदनवन झोपडपट्टी येथील रहिवासी आहेत. मृताचे नाव मिथुन होते. २२ फेब्रुवारी २०१२ रोजी आरोपींनी मिथुनला पेट्रोल टाकून जाळले असे पोलिसांचे म्हणणे होते. मिथुन ४२ टक्के जळाला होता. त्याचा १६ मार्च रोजी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सत्र न्यायालयाने २१ नोव्हेंबर २०१४ रोजी तिन्ही आरोपींना भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर, आरोपींचे वडील बाबुरावला निर्दोष सोडले होते. शिक्षा झालेल्या आरोपींनी या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अतुल चांदूरकर यांनी विविध बाबी लक्षात घेता आरोपींचे अपील मंजूर करून सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला. उच्च न्यायालयात मिथुनचे मृत्यूपूर्व बयान संशयास्पद तर, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे बयान महत्त्वहीन ठरले. या आधारावर आरोपींना शिक्षा देऊ शकत नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. आरोपींतर्फे अॅड. राजेंद्र डागा यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)