दारू कमी पिण्याचा सल्ला देणाऱ्याला तीन भावांकडून ठेचण्याचा प्रयत्न
By योगेश पांडे | Published: May 16, 2023 04:40 PM2023-05-16T16:40:25+5:302023-05-16T16:40:50+5:30
Nagpur News दारू कमी पिण्याचा सल्ला देणे एका व्यक्तीचा चांगलेच महागात पडले. तीन भावांनी त्याच्यावर हल्ला करत दगडाने ठेचण्याचा प्रयत्न केला. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली व त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
योगेश पांडे
नागपूर : दारू कमी पिण्याचा सल्ला देणे एका व्यक्तीचा चांगलेच महागात पडले. तीन भावांनी त्याच्यावर हल्ला करत दगडाने ठेचण्याचा प्रयत्न केला. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली व त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
रुपेश साहू (२३, डिप्टीसिग्नल) असे जखमीचे नाव असून तो टाईल्स फिटिंगची कामे करतो. १४ मे रोजी एका पानठेल्याजवळून जात असताना त्याच्या ओळखीतील निकेश सोरी (डिप्टीसिग्नल) हा दारुच्या नशेत असलेला दिसला. रुपेशने त्याला दारू कमी पित जा असा सल्ला दिला व तो तेथून निघून गेला. सोमवारी रुपेशने काही लोकांची भेट घेतली व रात्री साडेनऊच्या सुमारास मित्र संजूला सोडण्यासाठी निघाला. रस्त्यात निकेश सोरी व त्याचे सख्खे भाऊ शालिक व नितू यांनी त्याला अडविले. मला दारू कमी पिण्याचा सल्ला का दिला असे म्हणत निकेशने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिव्या देऊ नको असे रुपेशने म्हटल्यावर तीनही भावांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
आरोपींनी मध्यस्थी करायला आलेल्या संजू शाहूलादेखील मारहाण केली. त्यानंतर निकेशने रस्त्यावरील मोठा दगड उचलला व त्याने रुपेशच्या डोक्यावर वार केले. यात रुपेश रक्तबंबाळ झाला. हे पाहून आरोपी पळून गेले. परिसरातील लोकांनी रुपेशला कळमना पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी रुपेशला मेयो इस्पितळात उपचारासाठी नेले. त्याच्या तक्रारीवरून तीनही भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.