नागपुरात पारडी पुलाच्या मार्गातील तीन इमारती पाडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:46 AM2018-05-16T00:46:48+5:302018-05-16T00:47:10+5:30
भंडारा मार्गावरील प्रस्तावित पारडी उड्डाणपुलाच्या रुंदीकरणात अडथळा ठरलेल्या तीन इमारती मंगळवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात महापालिका व नासुप्रच्या अतिक्रमणविरोधी पथकाने पाडल्या. सकाळी ११ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भंडारा मार्गावरील प्रस्तावित पारडी उड्डाणपुलाच्या रुंदीकरणात अडथळा ठरलेल्या तीन इमारती मंगळवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात महापालिका व नासुप्रच्या अतिक्रमणविरोधी पथकाने पाडल्या. सकाळी ११ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
यात गणेश मानकर यांच्या दोन मजली इमारतीसह १८ मीटरच्या जोड रस्त्यालगतच्या रहिवासी सुशीलाबाई गरोडिया, जयकिशोर जयस्वाल यांच्या इमारती पाडण्यात आल्या. तसेच दिलीप लालवानी, रश्मी चवरे, चंदाबाई देवरे, जीजाबाई मानवटकर, राकेश वाहणे, नरेंद्र उपरे, सुनील रंगारी, निरंजन शेंडे आदींची घरे तोडण्यात आली. लकडगंज झोनने यासंदर्भात घरमालकांना आधीच नोटीस बजावल्या होत्या. त्यानुसार मंगळवारी मनपा, नासुप्र व एनएचआयच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
दुसऱ्या एका पथकाने नेहरूनगर झोनमधील भांडेप्लॉट ते दिघोरी चौक या दरम्यानच्या मार्गावरील फूटपाथवरील अतिक्रमण हटविले. महाल झोनच्या पथकाने आजमशहा चौक व सीए रोडवरील फूटपाथवरील अतिक्रमण हटविले. कारवाईदरम्यान दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई मनपाचे सहायक आयुक्त अशोक पाटील, प्रवर्तन अधीक्षक यादव जांभुळकर, नासुप्रचे अभियंता संजय चिमूरकर, विभागीय अधिकारी भरत मुंडले, पथक प्रमुख मनोहर पाटील, प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे आदींनी केली.
प्रचंड पोलीस बंदोबस्त
पारडी मार्गावरील पक्की घरे पाडताना स्थानिक नागरिकांचा विरोध होणार असल्याची शक्यता विचारात घेता, प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ५० पोलिसांचा ताफा ठेवण्यात आला होता.