विष प्राशन करून तिघांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:07 AM2021-05-17T04:07:47+5:302021-05-17T04:07:47+5:30
नागपूर : शहरातील विविध भागांत राहणाऱ्या तिघांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. बेलतरोडी, नंदनवन आणि गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ...
नागपूर : शहरातील विविध भागांत राहणाऱ्या तिघांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. बेलतरोडी, नंदनवन आणि गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या.
मनीषनगर परिसरात राहणारा शुभम रामेश्वर मुनेश्वर या २३ वर्षांच्या तरुणाने शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास विष प्राशन केले. रामटेकेनगर नाल्याजवळ तो पडून दिसल्याने त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना डॉक्टरांनी मुनेश्वरला रविवारी सकाळी मृत घोषित केले.
नंदनवनमधील आदर्शनगर झोपडपट्टीत राहणारा मंगेश नामदेव वाघाडे या ३२ वर्षांच्या तरुणाने शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास विष प्राशन केले. त्याला मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी रविवारी दुपारी मृत घोषित केले.
अशाच प्रकारे गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंजीपेठ भागात आकाश राजूसिंग ठाकरे (वय ३३) यांनी १३ मे रोजी विष प्राशन केले. त्यांना मेयो रुग्णालयात भरती केले असता त्यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाला.
या तीनही प्रकरणांत बेलत रोडी नंदनवन आणि गणेशपेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
----