कपलिंग तुटल्यामुळे धावत्या रेल्वेचे तीन कोच झाले वेगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:12 AM2021-08-24T04:12:22+5:302021-08-24T04:12:22+5:30
नागपूर : धावत्या रेल्वेगाडीच्या कोचची कपलिंग तुटल्यामुळे तीन कोच रेल्वेगाडीपासून वेगळे झाल्याची घटना सोमवारी सकाळी ९.१५ वाजता नागपूर-इटारसी सेक्शनमध्ये ...
नागपूर : धावत्या रेल्वेगाडीच्या कोचची कपलिंग तुटल्यामुळे तीन कोच रेल्वेगाडीपासून वेगळे झाल्याची घटना सोमवारी सकाळी ९.१५ वाजता नागपूर-इटारसी सेक्शनमध्ये घडली. यामुळे मोठा अपघात टळून प्रवासी बालंबाल बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२६१६ नवी दिल्ली-चेन्नई जीटी एक्स्प्रेस सोमवारी सकाळी ९.१५ वाजता मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर-इटारसी सेक्शनमधून जात होती. अचानक नरखेड आणि तिनखेडादरम्यान या गाडीच्या अखेरच्या तीन कोचची कपलिंग तुटली आणि तिन्ही कोच गाडीपासून वेगळे झाले. ब्रेक पाइपला कोच जोडून राहतात. त्यामुळे अशी घटना झाल्यास इमर्जन्सी ब्रेक लागतो. या घटनेमुळे ब्रेक लागला आणि गाडी जाग्यावरच थांबली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली. त्वरित कॅरेज अँड वॅगन विभागाच्या स्टाफने कपलिंगची दुरुस्ती केली. त्यानंतर ही गाडी १०.१५ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होऊन बल्लारशाला पोहोचली. या घटनेमुळे कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसल्याची माहिती मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे जनसंपर्क अधिकारी एस. जी. राव यांनी दिली.
...........