नागपूरनजीक वाघाच्या हल्ल्यात तीन गाई ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 11:56 PM2020-12-30T23:56:34+5:302020-12-31T00:07:12+5:30
tiger attack घराकडे परत येत असलेल्या गाईच्या कळपावर वाघाने हल्ला चढविला. त्यात त्याने तीन गाईंची शिकार केली असून, एक वासरू जखमी झाले. ही घटना हेटीटाेला (ता. रामटेक) शिवारात साेमवारी (दि. २८) सायंकाळी घडली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर(रामटेक) : घराकडे परत येत असलेल्या गाईच्या कळपावर वाघाने हल्ला चढविला. त्यात त्याने तीन गाईंची शिकार केली असून, एक वासरू जखमी झाले. ही घटना हेटीटाेला (ता. रामटेक) शिवारात साेमवारी (दि. २८) सायंकाळी घडली.
वसंता बुधलाल आहाके, रा. मनसर, ता. रामटेक हे त्यांची गुरे घेऊन नेहमीप्रमाणे हेटीटाेला शिवारात गेले हाेते. सायंकाळी गुरांना घेऊन घराकडे परत येत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने गाईच्या कळपावर हल्ला चढविला. त्यात तीन गाई व एक वासरू वाघाच्या तावडीत सापडले तर इतर जनावरे भीतीने सैरावैरा पळू लागली. यात तीन गाईंचा मृत्यू झाला तर वासरू गंभीर जखमी झाले. या घटनेबाबत सवंता आहाके यांनी वन विभागाच्या मनसर व पटगाेवारी कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यामुळे क्षेत्रसहायक धर्मराज काकोडे, अशोक दिग्रसे, वनरक्षक पवन माकडे, श्रीकांत टेकाम यांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. वन विभागाने याेग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वसंता आहाके यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.