पन्नास दिवसांत तीन कोटींची तिकीट विक्री, क्यूआर कोडचा पर्याय, प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 08:59 AM2024-10-28T08:59:29+5:302024-10-28T08:59:39+5:30
रेल्वे स्थानकावर असलेल्या तिकीट काउंटरसमोर लांबच लांब गर्दीत उभे राहून तिकीट काढण्यास आतापर्यंत पर्याय नसल्याने प्रवासी रांगेत ताटकळत उभे राहत होते.
नागपूर : रेल्वेच्या तिकीट काउंटरसमोर गर्दीत उभे राहून तिकीट खरेदीचा व्यवहार करण्याऐवजी रेल्वे प्रवासी क्यूआर कोडच्या माध्यमातून झटपट तिकीट विक्रीचा व्यवहार करण्याला प्राधान्य देत आहेत. गेल्या ५० दिवसांत क्यूआर कोडच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांनी तीन कोटी रुपयांच्या तिकिटांची खरेदी
केली आहे.
रेल्वे स्थानकावर असलेल्या तिकीट काउंटरसमोर लांबच लांब गर्दीत उभे राहून तिकीट काढण्यास आतापर्यंत पर्याय नसल्याने प्रवासी रांगेत ताटकळत उभे राहत होते. परंतु काही महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना तिकीट खरेदी करण्यासाठी क्यूआर कोडचा पर्याय उपलब्ध करून दिला. त्याला रेल्वे प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गर्दीत आणि रांगेत उभे राहून तिकीट घेण्याऐवजी ग्राहक आता झटपट कोड स्कॅन करून पाहिजे त्या ठिकाणचे रेल्वे तिकीट विकत घेत आहेत.
प्रवाशांचा सहभाग...
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर २०२४ पर्यंत नागपूर विभागात एक लाख, ५४ हजार प्रवाशांनी क्यूआर कोडच्या माध्यमातून अनारक्षित तिकीट विकत घेतले.
त्यामुळे रेल्वेच्या तिजोरीत एक कोटी, २३ लाख, ५५ हजार ९३६ रुपये जमा झाले. दुसरीकडे २६,४८९ प्रवाशांनी १ कोटी, ४९ लाख, ५८ हजार रुपयांचे विविध श्रेणीचे आरक्षित तिकीट खरेदी केले.
प्रवासी आणि कर्मचारी दोघांनाही सोयीचे
- ऑनलाइन तिकीट खरेदी-विक्रीचा व्यवहार रेल्वे प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी या दोघांसाठीही सोयीचा आहे. कारण प्रवाशांना तासन्तास रांगेत उभे राहण्याची गरज राहत नाही. तसेच कर्मचाऱ्यांना सुट्या पैशांसाठी प्रवाशांसोबत वाद घालण्याची वेळ येत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑनलाइनचा व्यवहार झटपट पार पडतो. त्यामुळे तो दोघांसाठीही सोयीचा ठरतो.